खरेदी विक्री संघाचे चेअरमन कचरु गंधास, व्हाईस चेअरमन छबू थोरात यांनी दिली माहिती
…..
सिन्नर – शासनाने सलग दुसर्या वर्षी रब्बी हंगामातील मक्याची हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून सात बाराच्या उतार्यावर रब्बीच्या मका पिकाची नोंद असलेले शेतकरी आज ५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने विक्रीसाठी मक्याची नोंदणी करु शकणार आहेत. तर येत्या महाराष्ट्र दिनी अर्थात १ मेपासून प्रत्यक्ष मका खरेदीला प्रारंभ होणार असल्याची माहिती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन कचरु गंधास, व्हाईस चेअरमन छबू थोरात यांनी दिली.
रब्बीच्या हंगामासाठी मका खरेदीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट अजून शासनाने जाहीर केले नसले तरी आजपासून शेतकरी ऑनलाईन पध्दतीने शेतकरी आपल्या मक्याची नोंद करु शकणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकर्याने आपले आधार कार्ड, बँकेचे पासबुक यांची झेरॉक्स, बँकेचा आय. एफ. एस. कोड, रब्बीच्या मक्याची नोंद असलेला सात बाराचा उतारा घेऊन ऑनलाईन नोंद करावी. खरेदी विक्री संघाच्या सिन्नर येथील मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनही शेतकरी ही ऑनलाईन नोंदणी करु शकतील.
मका भरण्यासाठी आवश्यक असणार्या बारदानाचा तुटवडा भासल्याने अनेकदा मका खरेदी थांबवण्याची वेळ खरेदी विक्री संघाला दरवर्षी येत होती. या बाबीकडे संघाने पणन महामंडळासह शासनाने लक्ष वेधत पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत शासनाने तालुका संघाला ५० हजार बारदाने आगाऊ पाठवली आहेत. त्यामुळे यंदा खरेदीत कुठलाही अडथळा येणार नसल्याचे गंधास यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात मक्याचे उत्पादन वाढल्याने शेतकर्यांना खासगी बाजारात हजार-बाराशे रुपये क्विंटल दराने मक्याची विक्री करावी लागायची. त्यात शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागायचा. त्यातून सुटका व्हावी व मका उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने सलग दुसर्या वर्षी शासनाने रब्बीच्या मका खरेदीला मंजूरी दिली असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी या मका खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गंधास यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
मागील खरीपाच्या हंगामात शासनाने १८५० रुपये क्विंटल दराने मका खरेदी केला होता. त्यानूसार खरेदी विक्री संघाच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील ६०० शेतकर्यांचा १५६०० क्विंटल मका खरेदी करण्यात आला होता. मका खरेदीनंतर अवघ्या पंधरा दिवसात शेतकर्यांच्या बँक खात्यावर मक्याची एकूण २ कोटी ८८ लाखांची रक्कम जमा करण्यात आली होती.