सिन्नर – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी परवानगी घेऊनच साखरपूडा, विवाह पार पाडावेत व त्यात ५० पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू नयेत असे शासनाने आदेश दिले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत धुमधडाक्यात विवाह व साखरपूडा करण्याची हौस तीन कुटुंबाना चांगलीच महागात पडली. धुमधडाक्यात विवाह सोहळा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने तहसीलच्या गस्ती पथकाने ऐन विवाहाच्या वेळीच दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान अचानक हजेरी लावत तीन कुटुंबाकडून २५ हजारांचा दंड आज वसूल केला.
शासनाची परवानगी न घेता दातली येथे तीन विवाह सोहळे धुमधडाक्यात पार पडत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांना मिळाली. त्यांनी नायब तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाला तातडीने दातली येथे पाठवले. म्हाळू नरहरी भाबड यांच्या वस्तीवर साखरपुड्याचा सोहळा नुकताच आटोपला होता. मात्र, तेथे त्यानंतरही ६० ते ७० लोकांची उपस्थिती गस्ती पथकाला दिसून आली. त्यामुळे पथकाने ५ हजार रुपयांची दंडाची कारवाई करत ही रक्कम म्हाळू भाबड यांच्याकडून वसूल केली. रामदास भिमाजी भाबड यांच्या वस्तीवरही पथक गेले, तेव्हा साखरपुड्याचा सोहळा पार पडत होता. त्यासाठी त्यांनी परवानगी घेतलेली नसताना तेथे ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमा केल्याने रामदास भाबड यांच्याकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. खडूं कचरू आव्हाड यांच्या वस्तीवर पथक गेले असता तेथे विवाह सोहळा पार पडत होता. तेथेही ५० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. विवाहासाठी प्रशासनाची कुठलीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे खंडू आव्हाड यांच्याकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाई करणाऱ्या पथकात अव्वल कारकून दत्ता सोनवणे, महसूल सहायक राजेंद्र खडताळे, वाहन चालक रवी लोखंडे सहभागी होते.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. या आदेशाचे तालुक्यात काटेकोर पालन होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी गर्जे यांच्या नेतृत्वाखाली ५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गस्ती पथक तहसीलदारांनी नियुक्त केले आहे. हे पथक या पुढील काळात, अगदी शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील कार्यरत राहणार आहेत. हे पथक विवाह सोहळ्यांसह दुकाने व इतर अस्थापनांवरदेखील कारवाई करणार आहे. केलेल्या कारवाईचा दैनंदिन अहवाल तहसीलदारांना पाठवणे पथकाला बंधनकारक करण्यात आले आहे. सदर पथकाने आदेशाच्या अंमलबजावणीत हयगय अथवा कसूर केल्यास त्यांच्या विरोधात साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे. त्यामुळे हे पथक या पुढील काळात अधिक कार्यक्षमपणे काम करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
उद्या आढावा बैठक
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची व राज्य शासनाच्या ४ एप्रिल २०२१ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उद्या (दि.७) दुपारी ४ वाजता मुसळगाव औदयोगिक वसाहितीतील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मुसळगाव, माळेगावचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, ग्रामीण रुग्णलयाचे वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, निमाचे अध्यक्ष, स्टाईसचे चेअरमन, व्यवस्थापक या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दोन्ही वसाहतीतील कारखान्यांच्या प्रतिनिधींनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे.