सिन्नर -कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे शासनाकडून लावण्यात आलेल्या निर्बंधामूळे गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील लॉन्स, मंगल कार्यालये, केटरींग व्यवसायासह मंडप डेकोरेटर्स व्यवसायिक अडचणीत आले असून इतर व्यवसायांप्रमाणे निम्म्या क्षमतेची परवानगी देवून लॉन्सवर विवाह समारंभास परवानगी द्यावी अशी मागणी तालुक्यातील लॉन्स-मंगल कार्यालय असोसिएशन, केटरींग असोसिएशन, मंडप डेकोरेटर्स असोसिएशनने प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांना निवेदन देऊन केली आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामूळे शासनाने मंगल कार्यालयांमध्ये विवाहास बंदी घातली आहे. त्यामूळे सर्वच लॉन्स व मंगल कार्यालयाचे मालक आर्थिक अडचणीत आले आहेत. या व्यवसायावरच केटरींगसह मंडम डेकोरेटर्सचे व्यवसायदेखील अवलंबून आहेत. या सर्वांनाच मोठ्या आर्थिक फटका बसला असून या व्यवसायावर अवलंबून असणार्या अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातून अनेक कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने हॉटेल्स्, जीम, पब्लिक ट्रान्सपोर्टस्, सिनेमा हॉल, नाट्यगृह यासह अनेक व्यवसायांना क्षमतेच्या ५० टक्के वापराची परवानगी देत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे. विवाह समारंभांवर असणारी सरसकट बंदी हटवून लॉन्स व मंगल कार्यालयांना निम्म्या क्षमतेने परवानगी दिल्यास अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटण्यास हातभार लागणार आहे.
लाखो रुपयांची गुंतवणूक करुन, कर्ज काढून अनेकांनी लॉन्स उभे केले आहेत. त्यांच्यावरील कर्जाचा बोजाही वाढतो आहे. या सर्व बाबींचा विचार करुन इतर व्यवसायांप्रमाणे निम्म्या क्षमतेने मंगल कार्यालय सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवदेनाची प्रत प्रांताधिकार्यांसह तहसिलदारांनाही देण्यात आली आहे. त्यावर मातोश्री नर्मदार लॉन्स, गोविंद गोपाळ लॉन्स, ज्वालामाता लॉन्स, भगवती मंगल कार्यालय, रौनक लॉन्स, लक्ष्मीनारायण लॉन्स, उगले लॉन्स, जय भवानी मंगल कार्यालय, रामकमल मंगल कार्यालय, गोंदेश्वर लॉन्स, बंधन लॉन्स, आर्शिवाद लॉन्स, रुखमाई मंगल कार्यालय, राधाई लॉन्स, समर्थ लॉन्स यांच्य संचालकांसह विविध केटरर्स, मंडप डेकोरेटर्सच्या संचालकांच्या सह्या आहेत.