माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते लोकार्पण
सिन्नर – सिन्नर नगर परिषदेचे प्रभाग १२ मधील नगरसेवक पंकज मोरे यांच्या स्वखर्चातून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी अशा वीस बाकांची व्यवस्था केली. यशवंनगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या बाकांचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले.
दररोज सकाळ व सायंकाळच्यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक घराबाहेर फेर फटका मारण्यासाठी निघत असतात. मात्र, फिरता फिरता थकल्याने कुठे बसावेसे वाटले तर परिसरात अशी कुठलीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रभागात ठिकठिकाणी बाकी टाकावेत अशी मागणी प्रभागातील ज्येष्ठांकडून करण्यात येत होती. या संदर्भात मोरे यांनी नगर परिषदेत पाठ पुरावा केला होता. मात्र, अशा बाक अथवा बाकड्यांसाठी नगर परिषदेत कुठलीही तरतूद नव्हती. मात्र आपल्या प्रभागातील ज्येष्ठ कुठल्याही सोयी सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी मोरे नेहमीच सतर्क असतात. त्यामुळे ज्येष्ठांची गैरसोय दूर करण्यासासाठी स्वखर्चाने २० बाक घेण्याचा निर्णय मोरे यांनी घेतला व हे बाकी जेष्ठांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते यशवंत नगरमधील मोरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर नुकतेच छोटेखानी समारंभात या बाकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या.
नगरसेवक पंकज मोरे यांच्याकडून सदर प्रभागात आजवर अनेक विकासकामांना चालना मिळाली आहे. यशवंतनगर, झापवाडी, समर्थ नगर, अजिंक्यतारा, मॉडेल कॉलनी परिसरात रस्त्याचे डांबरीकरण, भूमिगत गटारी, वृक्षरोपण तसेच स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत. प्रभागातील वेगवेगळ्या भागात आता बाक ठेवण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.