सिन्नर : सिन्नर आद्योगिक वसाहतीत अवजड वाहनासह इतर वाहनांना माल वाहतुकीला जाण्यासाठी जलद सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तसेच या परिसरात वाढलेल्या अपघाताच्या घटनांना आळा बसण्यासाठी शिर्डी महामार्गावरील मुसळगाव एमआयडीसी ते जुन्या केला फॅक्टरीपर्यंत या रस्ताचे चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे आज दिल्ली येथे एका खास भेटीत केली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत वसली आहे. एम.आय.डी.सी. परिसरात जाण्या-येण्याचे मार्गावर नियमित अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय अरुंद रस्त्यामुळे नियमित वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ५ वर्षात या ३ किलोमीटर च्या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले असून काहींनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे सिन्नर – शिर्डी राष्टीय महामार्ग क्र. १६० वरील CH 59/200 ते 62/800 या ३ किलोमीटरच्या महामार्गचे चौपदरीकरण करून दुभाजक बसविण्यात यावा, अशी मागणी येथील कारखानदार तसेच वाहन चालकासह तमाम सिन्नर वाशियानी खासदार हेमंत गोडसे यांच्या कडे केली होती. यापूर्वी काही शिष्टमंडळानी देखील खासदार गोडसे यांची भेट घेत याबाबत मागणीचे निवेदन दिले होते.
नागरिकांची तसेच कारखानदार, वाहन चालक यांच्या मागणीची गंभीर दखल घेत, खासदार गोडसे यांनी आज दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खास भेट घेऊन सिन्नर – शिर्डी राष्टीय महामार्ग क्र. १६० वरील CH 59/200 या ३ किलोमीटर महामार्गचे चौपदरीकरण करून दुभाजक टाकण्याची आग्रही मागणी केली.
दरम्यान, खासदार गोडसे यांनी आपली मागणी न्यायिक असल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पटवून देत, याबाबत सविस्तर चर्चा केली. या महामार्ग बाबत लवकर केंद्राकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिले.
यावेळी त्यांनी गुरेवाडी ते सिन्नर शहर या रस्ताचे चौपदरीकरण करण्यात यावे अशी दुसरी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केली आहे.
केंद्र सरकारकडून आश्वासन मिळाले
एम.आय.डी.सी. ते संगमनेर नाका दरम्यानच्या महामार्ग चे चौपदरीकरण करून दुभाजक टाकण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी केली आहे. लवकर याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे केंद्राकडून आश्वासन मिळाले आहे.
हेमंत गोडसे, खासदार