सिन्नर – सिन्नर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून उपजिल्हा रुग्णालय व रतन इंडियातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार राजभाऊ वाजे यांनी दोन्ही रुग्णालयांमध्ये भेट देत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याऐवजी कोणीतरी फोन केला म्हणून इंजेक्शन दिले जात आहे. हे चुकीचे असून कुणाचा तरी फोन आला म्हणून एखाद्या रुग्णाला हे इंजेक्शन देण्यापेक्षा गरजू रुग्णांनाच हे इंजेक्शन प्राधान्याने द्यावे अशी सूचना खासदार गोडसे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठिता डॉ. वर्षा लहाडे यांना केली.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा आवश्यक साठा रुग्णालयाकडे आहे. गरजू रुग्णांनाच प्राधान्याने इंजेक्शन दिले जाईल अशी ग्वाही डॉ. लहाडे यांनी दिली. तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याबाबत गोडसे व वाजे यांनी चिंता व्यक्त केली. बाहेर कुठल्याही रुग्णालयांमध्ये बेड मिळत नसल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दाखल करून घेण्यात येते. निफाड, जेल रोड, नाशिक येथूनही आलेले रुग्ण दाखल करून घेतले असल्याकडे डॉ. लहाडे यांनी लक्ष वेधले. रुग्णालयात येणारे अनके रुग्ण गंभीर स्वरूपाचे असतात. त्यांना वाचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त दिसत आहे. ज्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जायचे आहे. त्यांना सोडण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या. तालुक्यात यापूर्वी ४ खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. अजूनही २-३ रुग्णालयांनी सेंटर मिळण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. त्यांची तातडीने पाहणी करून त्यांना कोविड सेंटर म्हणून मान्यता देण्याची सूचना गोडसे, वाजे यांनी केली. तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून ती आटोक्यात आणण्यासाठी खासगी रुग्णालयांना बरोबर घेऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपजिल्हा रुग्णालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने, आहे त्या अधिकारी, कर्मचा-यांवर ताण वाढत आहे. तालुक्यातील सर्व प्राथामिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाबरोबरच स्वॅब तपासणीचे कामही वेगाने सुरु असून आज १५ एप्रिल या एकाच दिवसात तालुक्यात ८८३ एवढ्या विक्रमी रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. या कामामुळे तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयाला सेवा देऊ शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर खा. गोडसे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व उपजिल्हा रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचारी वाढून देण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
जिल्ह्यातील पेठ, सुरगाणासह रुग्ण कमी असलेल्या तालुक्यातील अधिकारी सिन्नरला पाठविणेबाबतची सूचना गोडसे यांनी केली. उपजिल्हा रुग्णालयात १७४ रुग्ण दाखल असून त्यातील १५० वर रुग्णांना ऑक्सिजन दिला जात आहे. त्यासाठी खास ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. रतन इंडियात ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण वाढला असला तरी चिडचिड होऊ देऊ नका. कोरोनाच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे असा विश्वास खा. गोडसे यांनी व्यक्त केला. कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य ती वागणूक देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उदय सांगळे, प्रांत पूजा गायकवाड, तहसिलदार राहुल कोताडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी मुरकुटे व अधिकारी उपस्थित होते.