सिन्नर – सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत अनेक ठिकाणी मातब्बरांना धुळ चारत तरुणांनी ग्रामपंचायत यश संपादन केलले. सोमठाण्यात विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पॅनलला सख्ख्या भावाने आव्हान देत विजय संपादन केले. येथे आमदारांचे भाऊ भारत कोकाटे व विजय कोकाटे यांनी जनसेवा पॅनलच्या माध्यमातून आव्हान दिले होते. जनसेवा पॅनलला ७ जागा मिळाल्या तर नम्रता पॅनलला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले.
तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्यानंतर ९० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. अनेक ठिकाणच्या अटीतटीच्या झालेल्या लढतीच्या ग्रामपंचायतींचे निकाल धक्कादायक लागले आहे.
नायगाव गटातील शिवसेनेचे पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे व गोदा युनियनचे चेअरमन लक्ष्मणराव सांगळे यांची युती मतदारांनी नाकारली आहे. चिंचोली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे माजी सरपंच संजय सानप यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. मिठसागरे ग्रामपंचायतीवर अॅड. शरद चतुर यांच्या पॅनलने ७ जागांवर विजय मिळवला. तर कोकाटे समर्थक कांदळकर गटाला अवघ्या २ जागांवर विजय मिळाल्या. सोनांबेत माजी जिल्हा परिषद सदस्य केरु पवार व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रामनाथ डावरे यांच्या गटाला जबरदस्त धक्का देत तरुणांनी सत्ता काबीज केली आहे. वडांगळीत शिवसेनेचे दिपक खुळे व आ. कोकाटे समर्थक रामदास खुळे, जाकिर शेख यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.
या उमेदवारांसाठी चिठ्ठी ठरली लकी
वडगाव-सिन्नर येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये वंदना विश्वास गिते व मंगल नितीन आव्हाड (२८८) यांना समाना मते पडली. टाकलेल्या चिठ्ठीत वंदना गिते विजयी ठरल्या. कहांडळवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मधील रुपाली शंकर कहांडळ व कांचन लक्ष्मण कोकणे यांना (१६७) समान मते पडल्यामुळे येथे चिठ्ठी काढण्यात आली. त्यात कोकणे या विजयी झाल्या. पाटोळेतीलही प्रभाग तीन मधील आशा राजेंद्र खताळे व मोहिनी गणेश खताळे (२९९) यांनाही समान मते पडली. चिठ्ठीत मोहिनी खताळे विजयी ठरल्या.