सिन्नर : सिन्नर तालुक्यातील माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या आरोग्यावर मोफत उपचार करण्यासाठी स्वंतत्र रुग्णालय उभारावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने माळेगाव, मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी सिन्नर येथे ३० खाटांच्या स्वतंत्र रुग्णालयाला मंजूरी दिली असल्याची माहिती खा. हेमत गोडसे यांनी दिली. या रुग्णालयात दोन्हीही एमआयडीसीत काम करणार्या शेकडो कारखान्यांमधील ५० हजारांहून अधिक कामगार, कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुबियांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे आशिया खंडातील नावाजलेली सहकारी औद्योगिक वसाहत ३० वर्षाहून अधिक वर्षांपासून उभी आहे. माळेगाव येथे राज्य शासनाची औद्योगिक वसाहत उभी राहिली आहे. मुसळगाव वसाहतीमध्ये सध्या ३७० छोटे-मोठे कारखाने सुरु असून तेथे २० हजारांहून अधिक कामगार, कर्मचारी काम करतात. माळेगाव वसाहतीमध्ये हजारांहून अधिक छोटे-मोठे कारखाने कार्यरत असून तेथे ३० हजारांवर कामगार, कर्मचारी काम करतात. या सर्वांनाच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यासाठी मोठा आर्थिक खर्चही सोसावा लागतो. ही बाब हेरुन माजी आमदार राजाभाऊ वाजे, मुसळगांव वसाहतीचे संचालक नामकर्ण आवारे यांनी खा. गोडसे यांच्याकडे वारंवार कामगार रुग्णालयासाठी पाठपुरवठा केला होता. अनेक उद्योजकही त्यासाठी खा. गोडसे यांच्याकडे पाठपुरवठा करत होते. सिन्नरकरांची ही मागणी न्यायिक असल्याने खा. गोडसे यांनी गेल्या दोन वर्षांपासून केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाकडे रुग्णालयाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु केला होता.
केंद्राचे श्रम आणि रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी खा.गोडसे यांच्या मागणीची गंभीर दखल घेत ३० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दोन्ही औद्योगिक वसाहतींच्या मध्यभागी असलेल्या सिन्नर शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा फायदा औद्योगिक वसाहतींमधील ५० हजारांहून अधिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून कामगार, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना उच्च दर्जाचे आरोग्य विषयक उपचार जलद व मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या रुग्णालयासाठी सिन्नर नगर परिषद किवा जिल्हाधिकारी यांच्याकडून भूखंड उपलब्ध करुन घेण्यात येणार असून त्यानंतर रुग्णालय उभारणीच्या कामाचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली. यावेळी राज्य कर्मचारी विमा महामंडळ विभागाचे उपसंचालक निश्चल कुमार नाग, जितेंद्र खैरनार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयाच्या मंजूरीने कामगार, उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नव वर्षाची भेट…
३० खाटांच्या कामगार रुग्णालयाला मंजूरी मिळवून खा. गोडसे यांनी सिन्नरकरांना नव वर्षाची अनोखी भेट दिली आहे. ३०-३५ वर्षांपासून औद्योगिक नगरी म्हणून नावारुपाला आलेल्या सिन्नरमध्ये कामगार रुग्णालय व्हावे यासाठी ३-४ वर्षांपासून खा. गोडसे यांच्याकडे पाठपूरावा करत होतो. रुग्णालयाला मंजूरी मिळाल्याने दोन्ही वसाहतीतील ५० हजारांहून अधिक कामगार, कर्मचार्यांसह त्यांच्या कुटूंबियांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-राजाभाऊ वाजे, माजी आमदार
कामगारांना दिलासा देणारा निर्णय…
मुसळगाव व माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हजारो कामगार कर्मचार्यांना दिलासा देणारा निर्णय खा. गोडसे यांनी मंजूर करुन आणला आहे. सिन्नरमध्ये कामगार रुग्णालय असावे यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह खा. गोडसे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खा. गोडसे यांनी रुग्णालय मंजूर करुन आणल्याने सिन्नरकर त्यांच्या कायम ऋृणात राहतील.
-नामकर्ण आवारे, संचालक, मुसळगांव औद्योगिक वसाहत