नाशिक- विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणा-या सिन्नर तालुक्यातील अग्रगण्य कंपनी मेसर्स केएसबी पंप लिमिटेड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा परिषदेला १३ लाखाची ॲम्बुलन्स उपलब्ध करुन दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कंपनीचे महाव्यवस्थापक सुनील बापट एच.आर. डिपार्टमेंट प्रमुख चंद्रकांत वारुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या उपस्थितीत ही ॲम्बुलन्स जिल्हा परिषेकडे सुपुर्द करण्यात आली.
सध्या कोरोनासारख्या महामारीने सर्वत्र थैमान घातलेले आहे. सध्याच्या परिस्थितील आरोग्य यंत्रणेला सक्षम करणे गरजेचे आहे. शासनाकडून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र समाजासाठी आपलेही काहीतरी दायित्व लागते या सामाजिक जाणीवेतुन सामाजिक दायित्व या योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील अग्रगण्य कंपनी मेसर्स केएसबी पंप लिमिटेड (माळेगाव एमआयडीसी, तालुका सिन्नर) जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागासाठी ॲम्बुलन्स देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फोर्स कंपनीचे तेरा लाखाचे सुसज्ज वाहन जिल्हा परिषदेला उपलब्ध करुन दिले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत त्यांचे अभिनंदन करुन जिल्हा परिषदेकडून त्यांना स्मुतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान केले. जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पवार, भास्कर गावित, युवानेते उदय सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, महिला बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, युवानेते उदय सांगळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव ,तहसीलदार राहुल कोताडे, तसेच कंपनीचे अधिकारी राजेंद्र खोले,अविनाश सांगळे, संदीप शिंदे, जिल्हा परिषदेचे वाहन भांडार विभाग प्रमुख अंबादास पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोठुळे यांनी केले.