मुंबई – राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविड – १९ मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वस्त केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यातील कोविड – १९ चे संकट मोठे असून या संकटकाळात सिेनमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचे समाधान आहे. सिनेमा चालण्यासाठी सिनेमागृहांची आवश्यकता असते हे जरी खरे असले तरी महाराष्ट्राने पुनश्च: हरिओम करीत कामगारांना काम मिळावे यासाठी उद्योग क्षेत्र सुरु केले. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली. आता मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरु करण्यात येतील. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही असेही त्यांनी सांगितले.