महिलेचा मोबाईल हिसकावला
नाशिक – मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावल्याची घटना रविवारी (दि.२७) बजाज शोरुमसमोर, सर्व्हिस रोड, व्दारका येथे घडली. याप्रकरणी रिना गावीत यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिना गावीत सर्व्हिस रोडने पायी घराच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोनजण त्यांच्याजवळ आला. मोटारसायकल चालकाच्या मागे बसलेल्या एकाने गावीत यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. गावीत यांनी आरडाओरड केली असता दोघेजण मोटारसायकलवरुन फरार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन विकास पाटील करत आहेत.
सौभाग्य लेण्यावर चोरट्याने मारला डल्ला
नाशिक – पादचारी महिलेच्या सौभाग्य लेण्यावर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना रविवारी (दि.२७) शिवाजी चौक, सिडको येथे घडली. याप्रकरणी कविता महेंद्र विसपुते यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता विसपुते सिडकोतील एम. के. इलेक्ट्रॉनिक अॅण्ड जनरल दुकानासमोरुन जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरुन दोनजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने विसपुते यांच्या गळ्यातील सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. विसपुते यांनी आरडाओरड केली असता दोघेजण फरार झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के. के. कोल्हे करत आहेत.
अल्पवयीन मुलगी गायब
नाशिक – अनोळखी व्यक्तीने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना अंबडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेले. तिचा कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. अनोळखी व्यक्तीने तिला फूस लावून पळून नेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.
तडीपाराला बेड्या
नाशिक : वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे तडीपारीची कारवाई केलेला गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत व तडीपार आदेशाचे उल्लंघन करत घरातच वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास येताच नाशिकरोड पोलिसांनी त्याला अटक केली. रविवारी (दि.२७) राजवाडा, देवळाली गावामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस शिपाई कुंदन तोताराम राठोड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय २५, रा.राजवाडा, देवळाली गाव, नाशिकरोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणार्या व्यक्तीकडून वारंवार गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी शुभम सूर्यवंशी यास २ जून २०२० रोजी नाशिक शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना शुभूम सूर्यवंशी न्यायालय व संबंधित शासकीय अधिकार्याची परवानगी न घेता देवळाली गावातील राहत्या घरी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याने तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
वाहनाचा करंट लागल्याने एकाचा मृत्यू
नाशिक – अवजड वाहनातून माल खाली करत असताना वायरचा करंट बसल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२७) दुपारी दीड वाजेदरम्यान पळसेमध्ये घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रामदास भानुदास रवकले (वाय २९, रा.पळसे कारखाना रोड, सोमयानगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास रवकले हे अवजड वाहन (एमएच १५-इ-३५५५) घेवून एकलहरा येथे आली. या ठिकाणी त्यांनी वाहनात माल भरुन घेतला. ते पळसेतील फुलेनगर येथे वाहन घेवून आले. त्यानंतर वाहनातील माल खाली करत होते. त्यावेळी गाडीच्या फाळक्यास मेन लाइनच्या वायरचा त्यांना जोरदार झटका बसला. त्यामुळे ते स्टेरिंगवरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार ए. एम. गांगुर्डे करत आहेत.