नाशिक – सिडकोतील एकता चौकात चालत्या दुचाकीने अचानक रस्त्यात पेट घेतल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन स्थानिक तरुणांनी वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
विवेकानंद नगर जवळील एकता चौक येथे राजू घुटने हे त्यांच्या अॅक्टिवा (क्रमांक. एमएच १५ डीजी ३८८३) या दुचाकीने शुक्रवारी (१५ जानेवारी) दुपारी जात होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. ही बाब राजू यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी सोडून आपला बचाव केला. तर परिसरात उभ्या असलेल्या युवकांनी तातडीने पाणी टाकून आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा गाडीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता होती. यावेळी परिसरातील रोहन कानकाटे, कुंदन खरे व आधार मेडिकलचे संचालक आधार कुलकर्णी, निखिल पवार, अक्षय कुलकर्णी, अजय गोसावी आदी मदतीला धावून आले.
ऑईल लिक झाल्याने व अंतर्गत वायरीमुळे ठिणगी पडून दुचाकीला आग लागल्याचे दिसून आले. गाडीने पेट घेतला. आम्ही सर्व मित्र परिवाराने पाणी व रेती टाकून वेळीच आग विझवली. अन्यथा पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती.
– रोहन कानकाटे, स्थानिक तरुण