नाशिक – प्रसिद्ध गायक कैलास खेर याने सिंधी बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांचे गायनाचे कोणतेही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा गंभीर इशारा देवळाली कॅम्प येथील पुज्य सिंधी पंचायत आणि नाशिक जिल्हा सिंधी पंचायत फेडरेशन यांनी दिला आहे. याप्रकरणी पंचायतीने देवळाली कॅम्प पोलिसांना निवेदन दिले आहे.
पंचायतीने निवेदनात म्हटले आहे की, गायक कैलास खेर यांनी केवळ सिंधी बांधव नाही तर देशाचा अपमान केला आहे. भारतीय राष्ट्रगीतातून ‘सिंध’ हा शब्द वगळण्यात यावा, अशी मागणी खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ट्विटरद्वारे केली आहे. त्यामुळे सिंध शब्दावरुन देशातील तमाम सिंधी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सिंध हा शब्द भारतीय राष्ट्रगीतात सिंधी बांधवांच्या अस्तित्वाचे प्रतिक आहे. त्यामुळे खेर यांच्या मागणीने सिंधी बांधवांची अस्मिता दुखावली गेली आहे. याची दखल खेर यांनी घ्यावी. खेर यांनी तमाम सिंधी बांधवांची जाहीर माफी मागावी. तसेच, आपली मागणी मागे घ्यावी. अन्यथा खेर यांचे कोणतेही गायनाचे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाहीत, असा इशारा खेर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रकरणी पंचायत कायदेशीर मार्गाने जाब विचारणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुज्य सिंधी पंचायत देवळाली कॅम्प आणि नाशिक जिल्हा सिंधी पंचायत फेडरेशन यांच्यावतीने देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी रतन चावला, बाबुशेठ क्रिशनानी, प्रकाश चावला, मोहन मनवानी, मनोहर माखिजा, टिकम केवलानी, हरिष चावला, विजय कुकरेजा, अमित रोहिरा, राजु तोलानी, निर्मल धमेजा, सुनिल चावला, विनोद चावला, जयकिशन क्रिशनानी, नरेश कलाल, नरेश कुकरेजा, घनश्याम कुकरेजा, राजा चावला, तिरथ वासवानी, भरत दर्यानी, हासो, पोकरदास, अनिल ग्यानचंदानी आदींसह असंख्य सिंधी बांधव उपस्थित होते.
—
कैलाश खेर यांनी त्यांची मागणी मागे घ्यावी. सिंधी बांधवांची माफी मागावी. यासाठीच आमच्या निवेदनाची दखल घेत पोलिसांनी खेर यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करावा
- रतन चावला, अध्यक्ष, देवळाली कॅम्प सिंधी पंचायत