नाशिक – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा नाशिकलाच होण्याचा निर्णय झाला असून त्याची घोषणा शुक्रवारी साहित्य महामंडळाने केली आहे. संमेलनाच्या स्थळ पाहणी समितीने गुरुवारी (७ जानेवारी) नाशिकचा दौरा करुन स्थळ पाहणी केली होती.. या समितीची शुक्रवारी बैठक झाली. त्यात नाशिकला संमेलन घेण्याचे निश्चित झाले आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवसात हे संमेलन होणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी नाशिक आणि नवी दिल्लीचे प्रस्ताव होते. सार्वजनिक वाचनालय आणि लोकहितवादी मंडळ यांनी नाशिकमधून प्रस्ताव दिले होते. लोकहितवादी मंडळाला आयोजनाचा मान मिळाला आहे.
अशा झाल्या बैठका
या अगोदर साहित्य समितीची बैठक औरंगाबाद येथे ३ जानेवारी रोजी झाली. त्यात स्थळ पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी समितीही नियुक्त करण्यात आली. स्थळ पाहणी समितीमध्ये अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा समावेश होता. या समितीने गुरुवारी नाशिक दौरा केला. कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेश सोसायटीच्या कॅम्पसची पाहणी या समितीने केली. मात्र, दुपारच्या सुमारास पाऊस आल्याने या समितीच्या पाहणी दौऱ्यात व्यत्यय आला. त्यानंतर ही समिती औरंगाबादला परतली व बैठक घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिकला आता साहित्य कुंभमेळा भरणार आहे.