इंडिया दर्पण EXCLUSIVE
नाशिक – ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कवी ना. धों. महानोर यांच्या नावाची जोरदार चर्चा असली तरी महानोरच या पदासाठी अनुत्सुक आहेत. तसे महानोर यांनी इंडिया दर्पणशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घटनापत्रकात व नियमावलीत बदल करुन साहित्य संमेनलाचा अध्यक्ष एकमताने व बिनविरोध करण्याचा निर्णय अगोदरच घेतला आहे. त्यामुळे महानोर यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांनी मात्र स्पष्टपणे नकार दर्शवला आहे.
इंडिया दर्पणशी बोलतांना कवी महानोर म्हणाले की, दरवर्षी साहित्य संमेलन असले की माझ्या नावाची चर्चा होते. पण, मी गेल्यावेळेस याबाबत माझे स्पष्ट मत सांगितले आहे. त्यामुळे ही चर्चा का होते हे मला माहित नाही, असा प्रश्नच महानोर यांनी विचारला आहे.
नाशिक येथे यंदा होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे, अनिल अवचट यांची नावे चर्चेत आहेत. महानोर यांनी अनुत्सुकता दर्शविल्याने या दोघांपैकी एकाची निवड होणार की तिसराच साहित्यिकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याबाबत साहित्यिक वर्तुळातही चर्चा रंगत आहे.
महानोर हे अनुत्सुक असले तरी उत्तर महाराष्ट्रात हे साहित्य संमेलन होत असल्यामुळे त्यांनी हे पद घ्यावे असा आग्रह काही साहित्यिकांनी धरला आहे. २४ जानेवारी रोजी महामंडळाची बैठक होणार असून त्यात अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.