- एकच समिती संपूर्ण अधिवेशन काळात समन्वयाचे काम करेल – पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ
- उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे हे या समन्वयक समितीचे मुख्य समन्वयक
- नाशिक – मार्च महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील प्रशासकीय कामांची व्याप्ती तसेच त्यामध्ये विविध शासकीय विभागांची प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी विचारात घेता सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या दृष्टीने एक सर्वसमावेशक समन्वय समिती स्थापित करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे. या संदर्भात पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष भुजबळ यांचे शिबिर कार्यालय कार्यान्वित करण्यात आलेले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक २६ , २७ , २८ मार्च २०२१ रोजी रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे. कोविड १९ पार्श्वभूमीवर हे संमेलन आयोजित केले जात असल्यामुळे या संदर्भात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे . यासंदर्भात विविध शासकीय व पोलिस विषयक परवानग्या मिळवणे तसेच साहित्य संमेलनास आवश्यक ती शासकीय साधनसामुग्री व सहयोग मिळवून देण्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी म्हणून यापूर्वीच नितीन मुंडावरे उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व त्यानुसार मुंडावरे यांनी कामही सुरू केले आहे.
शिबिर कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे की नितीन मुंडावरे हे या समन्वयक समितीचे मुख्य समन्वयक राहतील व संमेलनाच्या आयोजकांकडून वेळावेळी प्राप्त होणाऱ्या अनुज्ञेय बाबींच्या पूर्ततेच्या संदर्भात संबंधित शासकीय विभागांशी समन्वय ठेवून त्यांचेकडून पूर्तता करून घेतील. समन्वय कक्षातील सदस्य आपापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात सुरू असलेल्या कार्यवाही बद्दल अवगत ठेवतील. स्वागताध्यक्ष यांचेकडून ज्या ज्या वेळी बैठक बोलवण्यात येईल त्यावेळेला समन्वय संदर्भातील करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत स्वागताध्यक्षांना नितीन मुंडावरे तसेच कक्षाचे अन्य सदस्य अहवाल सादर करतील. ही समिती सर्वसमावेशक असल्याने ही एकच समिती संपूर्ण अधिवेशन काळात समन्वयाचे संपूर्ण काम करेल, असेही या आदेशात पालकमंत्री तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी नमूद केले आहे.
अशी असेल सर्वसमावेशक समिती
उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे हे या सर्वसमावेशक समितीचे मुख्य समन्वयक असतील. त्यांच्यासोबत या समितीत सदस्य म्हणून महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सहाय्यक कामगार आयुक्त एस.टी. शिर्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता नाशिक शहर-१ धनंजय दिक्षीत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) नवलनाथ तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळांचे २ सदस्य या समन्वय समितीत असतील त्यातील एक सदस्य महिला असतील.