नाशिक – नाशिक येथे होणारे ९४ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावे यासाठी नाशिक पोलिस आयुक्त दीपक शिवानंद पाण्डेय यांनी सल्लागार समिती गठित केली आहे. संमेलनात होणा-या विविध कार्यक्रम, मिरवणूकसाठी परवानगी देणे, संमेलन सुरळीत पार पडावे यासाठी उपाय योजना करणे, वाहतूक व पार्किंग व्यवस्था इ.विषयांवर ही समिती विचार करणार आहे. या समितीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार, सार्वजनिक बांधकाम, विद्युतपुरवठा, प्रादेशिक परिवहन, अन्न व औषधे प्रशासन यांचे प्रतिनिधी आहेत. लोकहितवादी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून विश्वास ठाकूर आणि डॉ. वैशाली बालाजीवाले हे या समितीवर सदस्य म्हणून काम करणार आहेत.