नाशिक – २६, २७ व २८ मार्च रोजी नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही नाशिककरांसाठी गौरवास्पद बाब आहे. या साहित्य संमेलनासाठी भरीव सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन आ. देवयानी फरांदे यांनी केले . गुरुवार ११ रोजी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. देवयानी फरांदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार फरांदे यांनी संमेलनासाठी १० लाखाचे पत्र संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांना सुपूर्द केले.
यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, सभापती ऍड. श्याम बडोदे, यशवंत निकोळे, प्रा. सुहास फरांदे, गणेश कांबळे, संमेलनाचे समिती संयोंज़कि विश्वास ठाकूर कार्यवाह संजय करंजकर, सुभाष पाटील, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर आदी उपस्थित होते. आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले की, अ.भा. साहित्य संमेलन शहराचा उत्सव असून यासाठी नाशिक महानगरपालिकेने सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच महापालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना केल्या. संमेलनाच्या तीनही दिवशी आपण उपस्थित राहु असे आ. फरांदे यांनी सांगितले.
महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले होईल यासाठी नाशिक पालिका पूर्णपणे सहकार्य करेल, यासाठी लोकहितवादी मंडळासोबत पुढील बुधवारी बैठक होणार असून त्यात संमेलनाबाबत सविस्तर चर्चा करु असे सांगितले. यावेळी संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर यांनी आभार मानले.