नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिले वर्ष वगळता ९३ वर्षात पहिल्यांदा बाल साहित्य संमेलनाचा समावेश होत आहे. आणि तो मान वि. वा. शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे; ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. शिक्षण आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. शिक्षण संस्थांनी आपल्या पाल्यांवर साहित्यिक संस्कार व्हावेत यासाठी, तसेच त्यांच्या गुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी संमेलनातील बाल – मेळाव्याला सक्रिय पाठिंबा द्यावा असे आवाहन नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी केले.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाअंतर्गत बाल मेळाव्याबाबतीत नाशिकचे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण संस्थांचे संचालक प्रतिनिधी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरसौ. वैशाली झनकर-वीर, शिक्षण अधिकारी (माध्य.), राजीव म्हसकर,शिक्षण अधिकारी (प्राथ.), निलेश पाटोळे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ), ए. एम. बागुल, सहा. शिक्षण उपनिरीक्षक, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह संजय करंजकर, बाल मेळावा समिती प्रमुख संतोष हुदलीकर, गोखले एज्युकेशन संस्थेचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून नाशिक ही मंत्रभूमी ते तंत्रभूमी आणि आता साहित्य व शिक्षणभूमी म्हणून नाव कमावलेली भूमी आहे आणि संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्व शिक्षण संस्था भक्कमपणे पाठीशी उभ्या राहत आहे या बद्दल समाधान व्यक्त केले. गोखले शिक्षण संस्था सारखी नाशिकचे अग्रगण्य संस्थेने आपली जागा संमेलन स्थळ म्हणून तसेच कार्यालयासाठीही उपलब्ध करून दिली आहे. संदीप फाउंडेशन आणि भुजबळ नॉलेजसिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्था सहकार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. अजूनही इतर संस्थांकडून सहकार्य अपेक्षित आहे. याशिवाय प्रत्येक संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त संख्येने बाल साहित्य संमलेनात सहभागी होण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
शैक्षणिक संथा व शाळा ज्याप्रमाणे शैक्षणिक भेटी व सहली याचे आयोजन कारणात त्याप्रमाणे त्यांनी नाशिकला होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला भेट देण्याचा उपक्रम आवश्यक आहे असे सांगून सौ. वैशाली झनकर-वीर, शिक्षण अधिकारी (माध्य.), नाशिक यांनी त्यातून उद्याचे साहित्यिक घडण्याचे बीज रोवले जाईल असे प्रतिपादन केले. नाशिक मनपा हद्दीतील शाळा, तसेच तालुक्यातील शाळांनी दिवस निवडून आपल्या निवडक शिक्षक-विद्यार्थ्यांना संमलेनाला पाठविले तर संमेलनाचे ते सर्वसमावेशक लाभदायी होईल असेही त्यांनी नमूद केले.
सुरुवातीला बाल मेळावा प्रमुख संतोष हुदलीकर यांनी प्रास्ताविकातून बाल मेळाव्याची माहिती दिली. अखेरीस संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर यांनी आभार मानले. या बैठकीत रंजन ठाकरे, स्वप्नील पाटील, गीता बागुल, सविता कुशारे, अभिजित साबळे आणि विविध शैक्षणिकी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
होते.