नाशिक – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कविकट्टा हे प्रमुख आकर्षण होणार याची सर्व चिन्हे दिसू लागली आहे. आज पर्यंत या कविकट्ट्यासाठी २७५० इतक्या कविता प्राप्त झाल्या आहेत व उर्वरित वेळ लक्षात घेता हा आकडा सहजपणे ३००० होईल असे दिसते.
आंतरराष्ट्रीय सहभाग
आपले मराठी भाषिक आणि कवी संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशातूनही वास्तव्य करतात. संमेलनाच्या निमित्ताने असे अनेक कवी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. ९४ व्या संमेलनामध्ये केवळ महाराष्ट्राच नव्हे तर भारतातील विविध राज्यातील कवी आणि कवयित्री येत आहेत. यामध्ये गोवा राज्यातून अंजली चितळे, रिया लोटलीकर, संजय घुग्रेटकर, मंद सुंगिरे, सानिका देसाई, कर्नाटकमधून कविता वालावलकर, गुजरात मधून वैजयंती दांडेकर, अंजली मराठे, वैशाली भागवत, मध्यप्रदेश मधून उषा ठाकूर, रजनी भारतीय, नवी दिल्लीहून राधिका गोडबोले यांचा सहभाग आहे. याखेरीज अमेरिकेतून डॉ. गौरी कंसारा आणि सिंगापूर मधून स्मिता भीमनवार याही आपल्या कविता सादर करणार आहेत. एकंदरीत हा कविकट्टा नवा विक्रम करेल असे जाणवत आहे.
सतत २ दिवस हा कविकट्टा विविध भावभावनांच्या कवितांनी खऱ्या अर्थाने फुलणार आहे. या कविकट्ट्याचे संपूर्ण नियोजन विशेष उत्साहाने कविकट्टा समिती प्रमुख संतोष वाटपाडे, राजेंद्र उगले, विजयकुमार मिठे, संजय गोर्डे, अलका कुलकर्णी, महेंद्र देशपांडे हे करीत आहेत.