नाशिक – ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारी रोजी होणार आहे. महामंडळाची २३ जानेवारी संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेची बैठक आहे. त्यानंतर २४ जानेवारी रोजी संमेलनाध्यक्ष निवडीची बैठकही नाशिकमध्येच होणार आहे. या बैठकीनंतर नाशिकलाच नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले – पाटील यांनी इंडिया दर्पणशी बोलतांना दिली.
या संमेलासाठी अनेक नावे मी वर्तमानपत्रात वाचतो आहे. त्याची चर्चा सुध्दा आहे. पण, अध्यक्ष कोण होणार हे आता मला ही सांगता येणार नाही. महामंडळाच्या १० विविध संस्था संमेलनाध्यक्षांचे नाव सुचवतील, एक नाव माजी संमेलनाध्यक्ष यांच्याकडून तर एक निमंत्रक संस्था नाशिक येथून येईल. त्यानंतर त्यावर विचार करुन संमेलनाध्यक्षाची निवड केली जाईल असेही ठाले – पाटील यांनी सांगितले. ही नावे २१ पर्यंत महामंडळाकडे येणे अपेक्षित आहे. पण, या नावावर निर्णय मात्र २४ जानेवारीला नाशिकमध्येच होईल. येथेच आम्ही घोषणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक येथे यंदा होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कवी ना.धों. महानोर, ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे, अनिल अवचट यांची नावे चर्चेत आहेत. महानोर यांनी अनुत्सुकता दर्शविल्याने या दोघांपैकी एकाची निवड होणार असे बोलले जात होते. पण, संमेलनाध्यक्षासाठी जवळपास अद्यापर्यंत २५ नावांची चर्चा आहे. पण, या संस्था जे नाव सुचवीत त्यावरच निर्णय होणार असल्यामुळे चर्चेत असलेली नावे चर्चेतच राहू शकता असेही बोलले जात आहे.