नाशिक – लोकहितवादी मंडळाच्या वतीने नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन प्रज्ञा पर्व नाशिक या संस्थेच्यावतीने संयोजन समितीला देण्यात आले आहे. प्रेमानंद गज्वी हे मराठीतील दिग्गज नाटककार असून त्यांनी चौदा नाटके लिहिली आहेत. देवनवरी, तनमाजोरी, किरवंत, गांधी-आंबेडकर, अभिजात जंतू अशी सरस नाटके लिहिणाऱ्या गज्वी यांनी एकांकिका , कविता, कथा, आदी साहित्य प्रकारात लेखन केले आहे. गज्वी यांच्या जागर , हवे पंख नवे या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. बोधी कला संस्कृती, सगुन-नगुण , आर्ट फाँर नाँलेज अशी वैचारिक ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाचे लेखक असणाऱ्या प्रेमानंद गज्वी यांना नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान मिळावे यासाठी दिलेल्या निवेदनावर प्रज्ञा पर्वचे अध्यक्ष वसंतराव रोहम , कार्याध्यक्ष नंदकिशोर साळवे , सचिव विजय होर्शिळ, कोषाध्यक्ष एम एल नकोशे यांच्या सह्या आहेत.