साहित्य संमेलनाची खरंच गरज आहे काय?
नाशिकमध्ये होऊ घातलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या नैसर्गिक प्रकोपाने पुढे ढकलेले आहे. फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन ऑनलाईन विज्ञानाची कास धरत होऊ घातले आहे. येत्या २५ आणि २६ मार्च रोजी हे संमेलन ऑनलाईन संपन्न होणार आहे.
– ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक (प्रवर्तक, राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन)
अनेकदा आमचे विद्वान साहित्यिक जे पुस्तकी दुनियेच्या बाहेर ज्यांना कोणी ओळखत नाही. त्यातील काही म्हणतात, ‘उदंड झाली साहित्य संमेलने यांची गरज काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ‘मेरी जीवन यात्रा’ मध्ये लिहतात,
‘मेरे उपर आरोप है, मैं काव्य नहि हूँ जानता ।
मुझको बडी इसकी खुशी, चाहे न कोई मान्यता ॥
पर लोग तो सब समझते है, मैं जहाँ गाने लगूँ।
लाखों किताबें जा चुकी, यहि प्रेम मैं पाने लगूँ ॥’
आजही राष्ट्रसंताच्या साहित्याची दखल पाहीजे तशी विद्वान, अभ्यासक घेत नाहीत.
साहित्य संमेलनाची खरंच नितांत आवश्यकता, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर ही पडत आहे. कारण ओबीसी महिला आजही लोकसंख्येने मोठ्या प्रमाणात असून सुद्धा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात फारच कमजोर आहेत. कारण परंपरेने स्त्रिला चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.
आजही मोठ्या प्रमाणात तोच प्रकार ओबीसी समाजात दिसतो. शिक्षणाच्या सोयी सवलती आज महिलांना मिळत आहे. पण दुसरीकडे शिक्षण हे महागडे होत आहे. सावित्रीबाई फुलेंनी मुली शिकाव्या म्हणून शाळा उघडल्या. त्यावेळेस जो त्रास भोगला, सनातनी लोकांनी सावित्री आणि ज्योतिबा यांचा अतोनात छळ केला. आज काही प्रमाणात ओबीसी मुली शिकतात आहे. पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा, अंधरूढ्या जोपासल्या जात आहेत. त्यातही ओबीसी भगीनी अग्रगण्य आहे. त्याचं चिंतन आज ओबीसी भगिनींनी करणे गरजेच आहे. कारण अंधश्रद्धेच्या पोथ्या घराघरात पोहोचतात. पण मानवी जीवनाला उपयुक्त ज्ञान देणारी पुस्तके, ग्रंथ ओबीसी महिलांच्या कपाटात सापडत नाही.
काही ठिकाणी मानवी जीवनाला ज्ञानामृत देणारे ग्रंथ लाल फडक्यात बांधल्या जाऊन त्यावर फुले वाहणे याला आम्ही खरी पूजा समजतो. ग्रंथ हे पूजेसाठी नसून त्यातील विचार मानवाच्या कल्याणाचे आहे हे समजून घेतले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनातून आम्ही सर्व आई भगिनी ओबीसी बहुजन महिलांच्या सुख-दु:ख यावर चर्चा करून तरुणी वाचक बनून लेखिका कशा होतील, आपल्या भावना लेखनाद्वारे त्या कशा व्यक्त करतील. याचं चिंतन मंथन या संमेलनातून होईल. असे मला वाटते.
या संमेलनाची खरी प्रेरणा ज्या संध्याताई राजूरकर यांच्या चिंतनातून निघाली. मला असं वाटतं की, त्या आधुनिक काळातील सावित्रीबाई आहेत. कारण आम्ही शिकतो पुस्तकी ज्ञान घेतो, डिग्री हातात मिळाली की आम्ही विद्वान झालो असं समजतो. कुठल्यातरी मंदिरात जाऊन कुठल्यातरी मूर्तीच्या समोर नतमस्तक होऊन तिची आराधना करतो. ‘देवा तुझ्यामुळे मी शैक्षणिक पात्रतेत निपून झालो.’ भगिनींनो सावित्रीबाई फुले यांनी कष्ट सोसले नसते, तत्कालीन समाज व्यवस्थेचा विरोध पत्करला नसता तर, आजही कुठल्यातरी घरात बंदिस्त राहून चूल आणि मूल सांभाळत बसल्या असत्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात,
विद्येअंगी व्हावा विनय । विद्या करी स्वतंत्र, निर्भय ।
शिक्षणाने वाढावा निश्चय। जीवन- जय करावया॥२०॥ ग्रा. अ. १९
याचसाठी शिक्षण घेणे। की जीवन जगता यावे सुंदरपणे ।
दुबळेपण घेतले आंदने । शिक्षण त्यासी म्हणू नये ॥२१॥
गावावर आली गुंडाची धाड। विद्यार्थी दारे लाविती धडाधड।
वाडवडिलांच्या अब्रुची धिंड। काय शिक्षण कामाचे ? ॥२२॥ ग्रा.अ. १९
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील महिलोन्नती अध्यायात लिहितांना म्हणतात,
विद्यागुरूहुनि थोर I आदर्श मातेचे उपकार।
गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥२॥ ग्रा. अ. २०
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी । तीच जगाते उद्धरी’
ऐसे वर्णिली मातेची थोरी । शेकडो गुरुहूनिहि ॥३॥ ग्रा. अ. २०
मातेच्या स्वभावे पुत्राची घडण। त्यास उज्वल ठेवी तिचे वर्तन ।
स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण । ऐसे आहे ॥४॥ ग्रा. अ. २०
भगिनींनो आपण या संमेलनात अनेक तरुणींना लिहीत करणार आहात. त्यांच्या शब्दातून भावना व्यक्त करतांना, अन्याय अत्याचाराचा विचार तर येईलच, पण स्त्री म्हणून माझे काय कर्तव्य काय आहे ? घरासोबत, कुटुंबासोबत, देशाच्या विकासात महिलांचे काय योगदान आहे. हे पण आपण समजून घेऊया.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्याविषयी लिहितात-
“पद्धतशीर जीवन जगण्याचे ज्ञान येणे, पद्धतशीर जीवनाचे सक्रीय तत्त्वज्ञान समजू लागणे हे ज्याला साधले, तो साहित्यिक मार्गाला लागला. आचारविचारांतील शुद्धता, संकुचित वृत्तीचा लोप, संघर्षशीलता, परस्परसहकार्याची ओढ गरिबांबद्दल प्रेमभावना, समान्नोतीच्या कल्पना याविषयीच्या विचारांची निर्मिती मनात होणे म्हणजे साहित्य.”
साहित्य झब्बूशाहीसाठी, दीनदुबळ्यांच्या झोपड्या चिरडण्यासाठी नाही. जगाला जागविण्यासाठी, जगाच्या निरीक्षणासाठी, जगाच्या विशालतेने विलीन होण्याचे शिक्षण घेण्यासाठी साहित्य आहे. साहित्याने भराभर उड्या मारत वा अंतराळातून उडत जायला नको. अशा तकलादू श्रमजीवी साहित्याचे भवितव्य विनाशाकडे वळणारे असते. असे साहित्य जिवंत राहत नाही.
आजचे साहित्य दळणाऱ्या बाईला कळावे, शेतकऱ्यांच्या शेतात फुलावे व नांगराच्या नांगरटी त्याचे पडसाद उमटावे, असे आमचे प्रतिपादन आहे. बुद्धाच्या जीवनाची उदात्त भावना प्रसारित करण्यासाठी जाड्या विद्वत्तेची गरज नाही.
मला असे वाटते की, आजदेखील कुणी फारसे शिक्षण न घेताही आपले डोळे उघडे ठेवून जगात विचारणा करील आणि दृश्यादृश्य प्रत्येक गोष्टीतून काही शिकेल, तर तो सुद्धा भगवान बुद्ध गेले त्या मार्गाने जाऊ शकेल.
मी पोथी वाचत न बसता रोजच्या जीवनाचा ग्रंथ दररोज वाचित आलो आहे.”
“आमच्या समाजातल्या रूढ्यांनी आमचे जीवन बरबटले आहे. आंब्याला बहर यावा त्याप्रमाणे आमच्या बायकांची अंगे दागिन्यांनी लदलद बडबडलेली असतात. अंगावर जरीकाठी उपरणे घालणाऱ्याच्या घराबाहेर ५० माणसे उष्टी पत्रावळी चाटण्यासाठी भांडत असतात. उघडे नगडे अर्धनग्न जीव कुत्र्यापेक्षाही निपट्टर बनून शीते चाटतात. अशा लोकांची साहित्यिकांना जाणीव नसावी हा दैवदुर्विलासच नव्हे तर काय?’
भगिनींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साहित्याविषयी ज्या भावना व्यक्त केल्या. त्याच भावना महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत नामदेव, संत कबीर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा या सर्व महापुरुषांनी व्यक्त केल्या आहेत.
येणारी तरुण पिढी ही मानवतावादी, समतावादी आदर्श बनवावी, यासाठीचा हा प्रयत्न, या प्रयत्ना मागे प्राध्यापक विना राऊत, प्राध्यापक माधुरी गायधने, निवासी संपादीका संध्याताई राजूरकर यांना मोलाची साथ आहे. तसेच या कल्पनेला बहुजन सौरभ या वर्तमानपत्राचे प्रबंध संपादक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, संपादक मिलिंद फुलझले, स्तंभलेखक विलास गजभिये, राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांचं पाठबळ, हिंम्मत ही संमेलना मागची प्रेरणा आहे.
या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा अंजनाबाई खुणे ज्यांना अभ्यासक झाडीपट्टी अशा मागास विदर्भात ‘झाडीपट्टीची बहिणाबाई’ म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांचं साहित्य हे कष्टकरी स्त्रीला हिम्मत देणार ठरलेल आहे. दुःखीकष्टी भगिनी त्यांच्या साहित्याने जीवनातील दुखाना विसरतात.
या संमेलनाचे उद्घघाटक विचारवंत श्रावण देवरे यांचही साहित्य समाज जागृती ला नवचैतन्य देत आहे.
मागच्या पहिल्या ऐतिहासिक फुले- शाहू -आंबेडकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ‘मुली जरा जपून’ या जनजागृती कार्यक्रमाच्या प्रणेत्या विजया मारोतकर ताई यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो. करोनाच्या महामारीमुळे हे संमेलन वेब द्वारे आम्ही घेत आहोत. यात जास्तीत जास्त भगिनी सहभाग घेतील आणि आपल्या सोबत इतरांच्या आयुष्यामध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणतील. अंधश्रद्धा, अंधरूढ्या नाकारतील. आपणास शुभेच्छा !