नाशिक – ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे सर्व नाशिककरांचे आहे. ते यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारी मंडळ, सर्व सभासद या संमेलनाला बळ देतील असे आश्वासन मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी संयोजन समितीच्या पदाधिका-यांना दिले. लोकहितवादी मंडळाच्या संयोजन समितीच्या वतीने जयप्रकाश जातेगावकर, सुभाष पाटील, प्रा.डॉ. शंकर बोराडे, संजय करंजकर यांनी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. साहित्य संमेलन ही महाराष्ट्राची सांस्कृतिक पर्वणी आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हे संमेलन तिसऱ्यांदा नाशिकमध्ये होत आहे, याचा आनंद वाटतो. या संमेलनासाठी लागणारे मनुष्यबळ आणि भौतिक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील आणि संस्थेचे काही प्रतिनिधी या संमेलनाच्या संयोजन समितीत सहभागी होतील ,असे आश्वासन पवार यांनी संयोजन समितीला दिले .यावेळी संयोजन समितीच्या वतीने संमेलनाचे बोधचिन्हाचे अनावरणा करण्याचे निमंत्रण त्यांना देण्यात आले.