नाशिक – येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त मनुष्यगौरव दिन साजरा करण्यात आला. यात सावळीराम तिदमे यांनी पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराची माहिती दिली. भक्ती फेरीतील स्वाध्याय परिवारचे विचार गावोगावी पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी नैतिकतेचे आणि अध्यात्माचे विचार दिले आहेत. निरोगी समाज घडविण्यासाठी त्यांचे कार्य महत्वाचे असल्याचे तिदमे म्हणाले. जगभरात स्वाध्यायाचा विचार रुजवणारे आधुनिक संत म्हणून पूजनीय दादांकडे पाहिले जाते. जाती धर्माच्या भिंती ओलांडून मानविजीवनाला आकार देणारे विचार समाजउपयोगी ठरत असल्याचे मत जेष्ठ स्वाध्यायी लेखक सावळीराम तिदमे यांनी व्यक्त केले. प्रारंभी तिदमे यांनी संस्कृत श्लोकाचे पठन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे यांनी केले. श्रीकांत बेणी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी केले. कार्यक्रमास कार्याध्यक्ष वसंतराव खैरनार, बालभवन प्रमुख संजय करंजकर, प्रा.सोमनाथ मुठाळ, दत्तात्रय कोठावदे तसेच वाचकवर्ग उपस्थित होते.