नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील ग्रंथालये बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे दूरावल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील सार्वजनिक वाचनालय देखील याला अपवाद नाही. दरवर्षी सार्वजनिक वाचनालयातर्फे वाचकांसाठी ‘साहित्य सावाना’ दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. परंतु यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेता डिजिटल स्वरूपात दिवाळी अंक प्रसिद्ध होणार आहे.
सावानातर्फ यंदा डिजिटल तसेच हार्ड कॉपी स्वरूपात दिवाळी अंक प्रसिद्ध होणार आहे. जेष्ठ साहित्यिक, लेखकांचा वारसा असल्याने सावानाच्या दिवाळी अंकात यंदा कोरोनामुळे खंड पडणार की काय अशी शंका वाचकांच्या मनात होती. परंतु, वाचकांचा हिरमोड होऊ नये यासाठी डिजिटल तसेच हार्ड कॉपी स्वरूपात दिवाळी अंक प्रसिद्ध केला जाणार आहे. शहरातील वाचनालय बंद ठेवण्याच्या निर्णयावर मधल्या काळात वाचकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, आता दिवाळी अंक येणार असल्याने वाचकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे सावानातर्फे ‘साहित्य सावाना’ हा दिवाळी अंकासाठी बालभवनतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी बालकविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पारितोषिक पात्र कविता दिवाळी अंकात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यात स्वरचित कविता पाठविता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कवितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. sahityasavana@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा ८३०८८४३६३८ / ९१५८७७४२४४ या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी कविता पाठवायच्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष विलास अौरंगाबादकर, कार्याध्यक्ष वसंत खैरनार, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, गिरीश नातू यांनी केले आहे.
—
डिजिटल अंकाचे काम सुरु
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा दिवाळी अंक डिजिटल आणि हार्डकॉपी अशा दोन्ही स्वरूपात प्रसिद्ध होणार आहे. परिस्थिती आटोक्यात आल्यावर ज्यावेळी वाचनालय सुरु होती तेव्हा वाचकांना दिवाळी अंक मिळणार आहे. डिजिटल अंकासाठीचे काम सध्या सुरु आहे, लवकरच ते पूर्ण होईल व अंक वाचकांपर्यंत पोहोचेल.
– जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव, सार्वजनिक वाचनालय, नाशिक