नाशिक – नाशिक शहर पोलिस आणि नाशिक महापालिका यांच्यातील वादाचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. वाहतूक सिग्नलची देखभाल कुणी करायची यावरुन हा वाद निर्माण झाला आहे. शहर पोलिस आयुक्तालयाने महापालिकेला पत्र देऊन तंत्रज्ञ व देखभालीची सूचना केली होती. तशी माहिती पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली आहे. मात्र, महापालिकेने ही सूचना न स्विकारल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील अनेक सिग्नल्स बंद पडले आहेत. परिणामी, सिग्नल बंद असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात वाहनचालकांकडून शहर पोलिस वाहतूक शाखेसह महापालिकेशी संपर्क केला जात आहे. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे चित्र आहे.