नवी दिल्ली – यंदाचा उन्हाळा तापदायक राहण्याचा अंदाज असून, पुढील तीन महिने कडक उन्हाळा राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मार्च ते मेदरम्यान रात्रीही उष्णतेनं जिवाची काहिली होणार आहे, अशी माहिती हवामान खात्याचे अतिरिक्त संचालक आनंद शर्मा यांनी दिली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा वायव्य भारत म्हणजेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, हरियणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, बंगाल आणि झारखंड इथं सामान्य पेक्षा अधिक तापमान राहील. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काही भागात हवामान गरम असू शकतं.
गोवा, सौराष्ट्र, कच्छ आणि ओदिशामध्येही या वेळी नेहमीपेक्षा अधिक तापमान असेल. कोकण, गोवा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही यंदा उन्हाचा पारा चढणार आहे. इतर राज्यात तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी असेल.
फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमानही सामान्यपेक्षा अधिक होतं. 2006 नंतर प्रथमच फेब्रुवारीमध्ये इतकी उष्णता जाणवत असल्याचं, आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे. प्रशांत महासागरात हिवाळ्यात एल निनोचा प्रभाव जास्त असल्यानं हिवाळाही अधिक काळ होता. परंतु त्याचा परिणाम कमी होताना दिसत आहे. यामुळे उष्णता वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे.