नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमध्ये बुधवारी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या पर्वतीय प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये १६ मार्चपासून पुढील ५ दिवस पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. त्याशिवाय गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्येसुद्धा पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएडीच्या ताज्या माहितीनुसार, पश्चिम भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे ईशान्येच्या राज्यात १९ मार्चपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड आणि मणिपूरचा समावेश आहे. या राज्यात जोरदार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
तसंच पश्चिमी हिमालायच्या क्षेत्रात नवं कमी दाबाचं क्षेत्र परिणाम दाखवण्यास सुरुवात करेल. त्यामुळे पश्चिम हिमालायाच्या भागात १७ आणि १८ मार्चला पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. देशाच्या वायव्य भागात १८ आणि १९ मार्चला पाऊस आणि वादळी वार्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
येत्या पाच दिवसांत १८ ते २० मार्चपर्यंत मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, देशात येत्या पाच दिवसात उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही येत्या दोन दिवसात पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे. या भागात इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासात हवामानात बदल होतील. मध्य प्रदेशातील भोपाळ, होशंगाबाद आणि उज्जैनमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील तसंच अधूनमधून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.