नाशिक – कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नाशिक महापालिकेने कोरोना नियमांची कडकपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे शहरात जिथे जिथे विवाह सोहळे व कार्यक्रम होत आहेत. तिथे महापालिकेची पथके जाऊन तपासणी करीत आहेत. याठिकाणी कोरोना नियम पाळले जात आहेत का, सर्वांनी मास्क घातला आहे का, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते आहे का, आदींची शहानिशा केली जात आहे. तसेच, बाजारपेठेसह सार्वजनिक ठिकाणी विनामास्क असलेल्या व्यक्तींवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना थेट १ हजार रुपयांचा दंड सुरू करण्यात आला आहे.
नाशिकरोडला ४० व्यक्तींकडून ८ हजार, नाशिक पश्चिम विभागात ३५ जणांकडून ७ हजार, नाशिक पूर्व भागात २१ जणांकडून ९ हजार, सिडको विभागात ३६ जणांकडून ७ हजार २००, पंचवटी विभागात ५२ जणांकडून १० हजार ४००, सातपूर परिसरात ४२ व्यक्तींकडून ८ हजार ४०० रुपये असा एकूण २२६ जणांकडून ५० हजार रुपयांचा दंड पहिल्याच दिवशी वसूल करण्यात आला आहे.