लंडन – ब्रिटममध्ये नव्याने सापडलेला नवीन कोरोना वेगाने पसरत चालला असून आतापर्यंत ४१ देशात त्याचा फैलाव झाल्याचे दिसते आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सतर्कतेचा इशारा दिला आहे.
१४ डिसेंबरला कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्याचे ब्रिटनने जाहीर केले होते. त्यानंतर अवघ्या ४ आठवड्यांमध्ये तब्बल ४१ देशांत त्याचा प्रसार झालेला आढळून आला. यानंतर अनेक देशांनी ब्रिटनच्या फ्लाईट्स रद्द केल्या. ब्रिटनने देखील यासाठी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तिथे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन सुरू झाले आहे.
भारताच्या प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, या कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्यानंतर जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
कोरोनाच्या या नवीन प्रकाराला अटकाव करण्यासाठी ब्रिटन सरकार लवकरच देशाच्या तसेच देशांतर्गत सीमा बंद करण्याबाबत विचार करत आहे. कॅबिनेट कार्यालय मंत्री मायकल गोव यांनी सांगितले की, सीमा बंदीबाबतचा नवीन प्रस्ताव लवकरच आणण्यात येईल. मात्र, नागरिकांनी दुसऱ्या देशात जाणे टाळायला हवे.
यासोबतच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा एकदा देशात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जवळपास फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हा लॉकडाऊन राहण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाची लस देण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन सुरू झाला आहे.
या व्हायरसने हल्ला करण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे आपणही जास्त सतर्क राहायला हवे, असे आवाहन पंतप्रधान जॉन्सन यांनी केले आहे. अत्यावश्यक गोष्टींसाठीच घराबाहेर पडण्यास सांगण्यात आले असून पर्सनल केअर – हेअर ड्रेसरची दुकाने बंद आहेत.