नवी दिल्ली ः फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्डइनसारख्या कंपन्या आपल्या युजर्सचा ५० ते ८० टक्के डाटा तिसर्या पक्षाला देत आहेत. त्या बदल्यात या कंपन्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैसे कमवत आहेत. अॅपलच्या अॅप स्टोरवर १०० प्रमुख मोबाईल अॅप्लिकेशनच्या एका विश्लेषणात हा खुलासा झाला आहे.
सायबर सुरक्षा एजन्सी पी-क्लाउडच्या या मूल्यांकनानुसार, १०० मधील ८० अॅप कोणत्या ना कोणत्या स्वरूपात युजर्सचा डाटा घेत असून, आपल्या उत्पादनांना विकण्यासाठी त्याचा उपयोग करत आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राम आपल्या ग्राहकांच्या ८५ टक्के डाटाचा स्वतः वापर करत आहे. या डाटामध्ये खासगी माहिती, सर्च, ब्राउजिंग हिस्ट्री आणि मोबाईल फोनच्या माहितीचा समावेश आहे.
सिग्नल, टेलिग्राम सुरक्षित
सिग्नल, क्लब हाउस आणि टेलिग्रामसारखे मेसेजिंग अॅप सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. तसेच नेटफ्लिक्स, मायक्रोसॉफ्ट टीम, गुगल क्लासरूम आदी अॅपसुद्धा सुरक्षित आहेत. हे अॅप आपल्या ग्राहकांच्या डाटाचा गैरवापर करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तरीसुद्धा कोणत्याही अॅपला आपला डाटा घेण्याची परवानगी देण्यापूर्वी युजर्सनी दक्षता बाळगली पाहिजे, अशी शिफारस करण्यात आली आहे.
डाटा घेण्यात इन्स्टाग्राम सर्वात पुढे
इन्स्टाग्राम अॅप आपल्या कोट्यवधी युजर्सचा ८० टक्के डाटा तिसर्या संस्था किंवा कंपनीला उपलब्ध करून देत आहे. यामध्ये युजर्सची खरेदीची हिस्ट्री, लोकेशन, कॉन्टॅक्ट, यूजेस आणि प्रोफाईल डाटाचा समावेश आहे. त्यानंतर फेसबुक आणि लिंक्डइनचा क्रमांक येतो. हे अॅप किमान ५२ टक्के डाटा तिसर्या पक्षाला देत आहे.