देवळा – सोन्यासारखा भाव मिळत असल्याने चोरट्यांनी आता त्यांचा मोर्चा थेट कांदा चाळींकडे वळविला आहे. देवळा व सटाणा तालुक्यात गेल्या आठवडाभरात पाच ठिकाणी कांदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. वाजगाव आणि वाखारी गावातील कांदाचोरीच्या घटना ताज्या असतानाच रविवारी (१ नोव्हेंबर) देवळा तालुक्यातील खामखेडा गावात आबाजी शेवाळे या शेतकर्याचा सुमारे ७ ते ८ क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केला आहे.
अतिवृष्टी आणि निर्यातबंदी नंतर आता कांदा उत्पादकांसमोर चोरट्यांचे आव्हान उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. चोरीच्या घटनांमुळे कांदा चाळींची राखण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. शेवाळे यांनी खामखेडा गावातील कालव्यालगतच्या आपल्या चाळीत चांगल्या भावाच्या अपेक्षेने ६०० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. त्यातील काही कांदा बाजारात विक्री केला होता. तर, उर्वरित १५० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. परंतु, रात्री चोरट्यांनी शिल्लक कांद्यापैकी ७ ते ८ क्विंंटल कांदा चाळीतून भरलेल्या पाट्यांसह चोरट्यांनी लंपास केला. शेवाळे यांचे वडील कारभारी शेवाळे दररोज रात्री कांद्याचे राखण करण्यासाठी जागत आहेत. मात्र, ते शेतात येण्यापूर्वीच चोरट्यांनी कांद्यावर डल्ला मारला.
गेल्या काही दिवसातील चोरीच्या घटना अशा
भऊर – १० क्विंटल
वासोळ – ८ क्विंटल
वाजगाव – १५ क्विंटल
खामखेडा – ७ ते ८ क्विंटल