मुंबई – कोरोनामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा पूर्ण बरे झाल्यावर हा आजार होत नाही, असा समज होता. मात्र, पुन्हा कोरोना होऊ शकतो असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
कोरोनामुळे जगभरात सुमारे तीन कोटी ४० लाख लोक बाधित असून यात सुमारे दहा लाख १५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे . भारतात देखील महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. मुंबई, पुणे शहराप्रमाणे नाशिक शहरात देखील रुग्णसंख्या लक्षणीय आहे. आता सर्वांनीच अधिक सावधानता बाळगायला हवी, कारण एकदा कोरोना झाल्यावर पुन्हा होऊ शकतो. नवीन संशोधनानुसार एखादी व्यक्ती कोरोना बाधित असेल तर पूर्णपणे बरी झाल्यावर देखील पुन्हा त्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो, त्यामुळे कोरोना झाल्यावर आता मला पुन्हा होणार नाही, अशा गैरसमजात आता कुणी राहू नये, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. तसेच त्याकरता पाच नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सांगण्यात येत आहे.
अशी घ्या खबरदारी
१ ) एक कोरोना मुक्त झाल्यावर रुग्णाने मास्कचा वापर,फिजिकल डिस्टंसिंग पाळणे, वारंवार हात धुणे यासारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
२ ) कोरोनाबाधित आणि कोरोना पासून मुक्त झालेल्या व्यक्तीने नियमित व्यायाम करण्याची गरज आहे, त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते.
३ ) सर्वांनी पोस्टीक आहार घ्यावा, रुग्णाला बरे वाटू लागल्यानंतर हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी, दूध आदींचा आहारात समावेश करावा .
४ ) आजारातून पूर्णपणे बरे झाल्यावर जास्तीत जास्त वेळ आराम करावा, शारीरिक व मानसिक ताण घेऊ नये, पुन्हा पूर्वीप्रमाणे आरोग्यपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा.
५ ) कोरोनातून बरे झाल्यावर देखील कालांतराने डोकेदुखी, थकवा, ताप, सर्दी अशी काही लक्षणे जाणवू लागल्यास दुर्लक्ष करू नये ,तज्ज्ञ डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य आवश्यक औषधोपचार घ्यावा.