नवी दिल्ली – कोरोना विषाणू प्रादुर्भावाची आक्रमकता तब्बल ३०० टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही २०० टक्क्यांनी वृद्धींगत झाली आहे. याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, यावेळी कोरोनाची दुसरी लाट अत्यंत आक्रमक असून नवीन विषाणूवर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण बनले आहे.
देशातील सुमारे १२ पेक्षाही जास्त राज्यांमध्ये नागरिकांना कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा मोठा सामना करावा लागत आहे. या साथीच्या आजाराला नियंत्रणात आणण्याचा अनुभव असूनही या राज्यात परिस्थिती सामान्य होत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे व्हायरस पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आहे.
यासंबंधीची आकडेवारी पाहिल्यास कोरोना विषाणूची आक्रमकता ३०० टक्क्यांनी वाढली आहे. केंद्र सरकारने साथीच्या दुसर्या लाटेसाठी राज्यांना जबाबदार धरले आहे. जुलै २०० मध्ये दररोज ६० हजारांहून अधिक प्रकरणे आढळून आली.
गेल्या वर्षी मार्चमध्ये भारतात प्रथम संसर्ग झाल्याची घटना घडली होती. तथापि, त्या काळात दररोज सरासरी १८७ संक्रमित रुग्ण आले होते. यानंतर, जुलैमध्ये दररोज ६० हजाराहून अधिक रुग्ण झाले होते, परंतु यंदा मार्च महिन्यातच कोरोना विषाणूने ६० हजारांपेक्षा जास्त आकडे गाठले आहेत. गेल्या ३० दिवसांत ३ लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे यावेळी विषाणूचे नियंत्रण करणे अधिक अवघड असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.