नवी दिल्ली – अनेक ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करण्याची सवय असते, परंतु त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते. तसेच जर एखाद्या मित्राने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करुन शॉपिंग करत असाल तर ते धोकादायक ठरू शकते.
अॅमेझॉनच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त अॅमेझॉन विनामूल्य भेट देत असल्याचा दावा करत हा व्हॉट्सअॅप संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या संदेशामध्ये लिहिले आहे, ‘अॅमेझॉन ३० वा वर्धापन दिन साजरा होत असून www.amazon.com कडून प्रत्येकासाठी विनामूल्य भेटवस्तू निवडली गेली आहे. यास फक्त एक मिनिट लागेल आणि तुम्हाला उत्कृष्ट बक्षीस म्हणून तुम्हाला एक ५ जी चा स्मार्टफोन भेट मिळेल. त्यानंतर लिंकसह फॉर्म भरल्यावर, एक बॉक्स बाहेर येत आहे आणि भेट बॉक्स उघडण्याचे सांगितले जाते.
आपण बॉक्स उघडल्यावर, आपल्याला एक संदेश मिळेल की, आपण हा संदेश आपल्या २० मित्रांसह व्हॉट्सअॅपवर सामायिक करू शकता किंवा पाच गटात सामायिक करू शकता. यानंतर, सर्व लोकांना अॅप डाउनलोड करावा लागेल, त्यानंतर भेट प्राप्त होईल.
सायबर तज्ज्ञाच्या मते, हा एक प्रकारचा सायबर घोटाळा आहे. याद्वारे आपली वैयक्तिक माहिती चोरी केली जाते आणि नंतर त्याचा गैरवापर केला जातो. आपण काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला आढळेल की, अशा संदेशामधील वेबसाइटच्या URL चे शब्दलेखन चुकीचे आहे. जर आपल्यालाही असा संदेश मिळाला, तर तो त्वरित हटवा आणि मित्रांना देखील सांगा की तो एक स्पॅम आहे.