नाशिक : साल्याचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या मेव्हण्यावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना जुने नाशकातील आझाद चौकात घडली. या घटनेत दगडफेक करीत टोळक्याने शालकासह त्याच्या मित्रास बेदम मारहाण केली असून,वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र रमेश सोनवणे,ऋषी राजेंद्र सोनवणे,रोहित राजेंद्र सोनवणे (रा.तिघे चर्मकारलेन,आझादचौक),अक्षय धनंजय कानडे व धनंजय महेश गायकवाड (रा.दोघे चव्हाटा) अशी संशयीतांचे नाव आहे. याप्रकरणी निलेश चंद्रकांत शेलार (३५ रा.वावरेलेन शिवाजी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेलार यांचा शालक सागर आणि संशयीत आते भाऊ रविंद्र सोनवणे यांच्यात दोन चार दिवसांपासून घरगुती कारणातून फोनवर वाद सुरू होते. यामुळे शेलार यांनी प्रत्यक्ष भेटून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. शेलार यांनी शालक सागर व त्याचा मित्र राहूल यास सोबत घेवून सोमवारी (दि.२८) आझादचौक गाठला असता संशयीत टोळक्याने गैरकायद्याची गर्दी जमवून दहशत निर्माण करीत सागर व त्याचा मित्र राहूल यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत एकाने शेलार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला असून त्यात ते जखमी झाले आहेत. तसेच संशयीतांनी तक्रारदार यांच्या कारवर (एमएच १५ एचसी २०३२) दगडफेक करून नुकसान केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.