नवी दिल्ली – अमली पदार्थ ठेवल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याने आपल्या मेव्हणीच्या म्हणजेच पत्नीच्या बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी न्यायालयानं सहा तासांचा पॅरोल दिला आहे. यादरम्यान येण्याजाण्याचा खर्च आरोपीलाच उचलावा लागेल असं न्यायालयानं म्हटलं आहे.
पतियाला हाउस न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. जैन यांनी तिहार कारागृह प्रशासनाला सांगितलं, की सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आरोपीला लग्नसोहळ्याला सुरक्षारक्षकांच्या देखरेखीखाली उपस्थित राहू द्यावे. तसंच आरोपी शिक्षा भोगत असल्यानं कौटुंबिक सोहळ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून, सुरक्षारक्षकांनी साध्या वेषात उपस्थित रहावे, असे निर्देश न्यायालयानं दिले.
मेव्हणीच्या लग्नात उपस्थित राहणं आवश्यक असून, त्यासाठी पॅरोल द्यावा, अशी मागणी आरोपीनं केली होती. मात्र पक्षकारानं याला विरोध केला. आरोपीला अशा लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी देणं उचित नाही. त्यामुळे इतरांनाही हा पर्याय मिळेल, असं पक्षकाराचं म्हणणं होतं. परंतु हा अंतरिम जामीन नसून, केवळ काही तासांसाठीची परवानगी आहे, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.