सार्वजनिक संस्थांचा दुवा निखळला
अण्णासाहेब बेळे यांना श्रद्धांजली वाहताना मनातील सारे भाव शब्दांकित करणे कठीण होत आहे. माणूस आपल्या मध्ये असणे आणि आपल्या मधून जाणे याच्यामध्ये केवढे तरी अंतर असते त्याचा विचार मी करीत आहे. ते जाण्यापूर्वी आधल्या दिवशी माझे आणि सौभाग्यवतींच्या बोलणे झाले. तिने मला विचारले होते, “बरेच दिवसात अण्णांकडचे समजले नाही आणि दुसऱ्या दिवशी अण्णा गेल्याची दुर्दैवी बातमी समजली.
– मिलींद मधुकर चिंधडे
अण्णा आणि मी, आम्ही दोघांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक, सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि अन्य संस्थांमध्ये बरोबरीने काम केले. आम्ही दोघेही संस्थेचे उपाध्यक्ष होतो.यजुर्वेदी संस्थेत आमचा दोघांचा संस्थेने एका वेळेला सत्कार केला होता. अण्णा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे 1969 ते 1985. या काळात संचालकही राहिले होते. अण्णा चेअरमनही झाले. त्या कार्यकाळात बँकेच्या शाखा वाढवल्या. नवीन जागा घेतली. नाशिक एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. उंटवाडी बाल विद्यालय, प्राथमिक विद्यालय, सि डिओ मेरी हायस्कूलचे ते चेअरमन राहिले होते. त्यावेळी कॉम्प्युटर एज्युकेशन त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले.संस्कृत भाषा सभेला कैलासवासी अण्णांची त्यांच्या पत्नी कैलासवासी सौ. सुधाताईंच्या नावाने देणगी मिळवून देण्यामध्ये माझा मोठा वाटा होता. त्या देणगीतून दर वर्षी एक व्याख्यान आणि एक पुरस्कार देण्यात येतो.
सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेमध्ये आम्ही दोघांनी अनेक वर्ष बरोबर काम केले. काही निवडणुका बरोबर लढवल्या. काही विरुद्ध लढवल्या. आमच्या मधील स्नेहा मध्ये कोणतंही अंतर पडले नाही. अण्णांनी सार्वजनिक वाचनालय नाशिक या महत्त्वाच्या संस्थेत कार्याध्यक्ष या पदापासून, अनेक पदे भूषवली होती. 1960 पासून वाचनालयात ते निवडून यायचे. ए कंदर 54 वर्ष ते कार्यकारी मंडळ सदस्य राहिले.वाचनालयाच्या कामाबरोबरच सरकार वाडा या वास्तूशी अण्णांचा निकटचा संबंध होता. त्याचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहावे याकरिता त्यांनी अखंड प्रयत्न केले. श्री कपालेश्वर, सोमवारची पूजा, उपास अण्णा नियमितपणे करायचे. परमेश्वर आणि श्री कपालेश्वर यांचेवर अण्णांची नितांत श्रद्धा होती. श्री कपालेश्वर मंदिराचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांनी अनेक सुधारणा मंदिरात घडवून आणल्या. श्रीराम रथयात्रेत 64 वर्ष अण्णा अखंडपणे सहभागी झाले होते.
आधाराश्रम महिला आश्रमाचे कार्यकारी मंडळ सदस्य म्हणूनही अण्णांनी काम केले. नासिक मुद्रक असोसिएशन स्थापन केली. नाशिकला मुद्रण परिषद भरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सोमेश्वर सहकारी सोसायटी, पंचवटी कारंजा वरील श्री नरोत्तम को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी स्थापन करण्यात अण्णांचा पुढाकार होता. तसेच श्री गजानन महाराज भक्त मंडळ संस्था स्थापना व नोंदणी अण्णांच्या पुढाकाराने करण्यात आली.
अण्णांना अध्यात्माची आवड होती. त्र्यंबकेश्वर येथील उपेन्द्र नाथ महाराजांच्या समाधी आश्रमात शेवटच्या काळात ते नेहमी जायचे. त्यांची जुनी राजदुत गाडी होती. ती नाशिकमध्ये फिरण्या करता शेवटची काही वर्षे सोडली तर कायम वापरायचे. त्या गाडीवर त्यांचा जीव होता. ज्या संस्थांशी त्यांचा संबंध आला त्यांच्यावर त्यांनी प्रेम केले. बांधकाम व्यवसायाशी त्यांचा संबंध होता. त्यांचा आणि माझा संबंध फार जुना म्हणजे जवळपास 45 वर्षांपूर्वीचा. आता एवढ्यात त्यांचा संपर्क राहिला नाही पण गेल्या पंचेचाळीस वर्षांचा स्नेह मात्र आता पारखा झाला हे नक्की. कधी मन मोकळे करायचे असले तर जरूर ते फोन करून माझ्याकडे येणार. त्यांच्यातील आणि माझ्यातील विश्वासाला मी कधी तडा जाऊ दिला नाही.
मृत्यू अटळ आहे. जीवन अगर मृत्यूचे भय बाळगणार्यांना समृद्ध जीवन जगता येत नाही. आयुष्य कितीही जगले यापेक्षा कसे जगले याला महत्त्व आहे. अण्णा कायम संस्थांच्या सान्निध्यात राहिलेले असल्यामुळे समृद्ध जीवन जगले. स्वतःला बांधकाम उद्योगाचे ज्ञान असल्यामुळे संबंध आलेल्या सर्वच संस्थांना त्याचा उपयोग करून दिला. श्री कपालेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देईल. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. अण्णा ज्या संस्थांकरता झटले त्या अधिक नावारूपाला आणणे ही त्यांना खरी श्रद्धांजली असेल.