नाशिक – बॅँकेतून बोलत असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची माहिती व ओटीपी नंबर मिळवून वृद्धाला एक लाख रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला. मात्र, पोलिसांच्या दक्षतेमुळे ही रक्कम परत मिळवण्यात यश आले असून तक्रारदारांने पोलीस कर्मचाऱ्यांना पेढे वाटप करत समाधान व्यक्त केले. सोपान गोटीराम एंडाईत (वय ७३) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी फिर्यादी एंडाईत यांना फोन आला व बॅँकेतून बोलत असल्याचे सांगितले. बोलण्याच्या ओघात फोनवर बोलणाºया व्यक्तीने एंडाईत यांच्याकडून त्यांच्या क्रेडीट कार्डची माहिती व ओटीपी नंबर मिळवला. सर्व माहिती दिल्यामुळे एंडाइत यांच्या एक लाख रुपयांची रक्कम वर्ग झाली. त्यामुळे त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पोलिसांनी तपास केला असता यातील ७० हजार रुपये कॅश फ्रि रिटेल या व्हॉलेटर तर ३० हजार रुपये एमपीएल या गेमींग अॅपवर गेल्यास लक्षात आले. ही रक्कम परत मिळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कॅश फ्रि व एम पीएल यांना तत्काळ मेल पाठवला व फोनवरून त्यांच्या नोडल अधिकाºयांसोबत संपर्क केला. त्यामुळे फिर्यादीचे एक लाख रुपये परत मिळाले.
तसेच फसवणूक करणाऱ्याच्या एमपीएल खात्यातून इतर तक्रारदारांचे ८० हजार रुपये परत मागवण्यात आले असून फिर्यादीनी संपर्क साधल्यानंतर ते त्यांना परत करण्यात येणार आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एंडाईत यांची संपुर्ण रक्कम परत मिळाली असून त्यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पेठे वाटप करून आनंद व्यक्त केला.