रांची – वेगवेगळ्या युक्त्या वापरून ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या सायबर ठगांनी आता थेट सरकारी तिजोरीलाच आपले लक्ष्य केले आहे. झारखंडमध्ये नुकतीच अशी काही प्रकरणे समोर आली आहेत. क्लोन चेकच्या सहाय्याने हे गुन्हेगार सरकारी खात्यांमधून कोट्यवधी रुपये लंपास करत आहेत. सायबर चोरांच्या या नवीन कल्पनांमुळे पोलिसांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
झारखंडमधील गढवा येथे पहिले प्रकरण झाले. भूसंपादन विभागाच्या खात्यातून या चोरांनी तब्बल १२ कोटी ६० लाखांची रक्कम लंपास केली. एका प्रकल्पासाठी ज्यांच्याकडून जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती, त्या नागरिकांना ही रक्कम द्यायची होती. दरम्यान, गढवा प्रकरणी सीआयडीने गणेश लोहरा, पंकज तिग्गा, मनीष जैन, मनीष पांडेय, रामकुमार तिवारी, इकबाल आणि अन्य एकाला अटक केली आहे. अशाचप्रकारे गुम येथील आयटीडीएच्या खात्यातून ९ कोटी तर रामगड गटविकास अधिकाऱ्यांच्या सरकारी खात्यातून ७८ लाख काढण्यात आले. रामगड प्रकरणात तीन चेक्सचा वापर करण्यात आला.
गेल्यावर्षी देखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. बोकारो जिल्हा परिषदेच्या खात्यातून २ लाख २७ हजार तर जिल्हा योजना समितीच्या खात्यातून २ लाख ९० हजार गायब झाले. या प्रकरणी पोलिसांनी पाटणा येथून दोघांना अटक केली आहे. पण या प्रकरणातून धडा घेत धनबाद नगरपालिकेने चेक पेमेंट थांबवले आहे. आरटीजीएस किंवा ऑनलाइन व्यवहार करणे, हे दोनच पर्याय नागरिकांसमोर आहेत. तसेच १० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी नगर आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
चेक क्लोन करून जी रक्कम लंपास केली जाते, ते क्लोन चेक पटणा तसेच कोलकाता येथे तयार होतात, असे सीआयडीचे म्हणणे आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, गढवा येथील १२ कोटी ६० लाखांची रक्कम लंंपास करण्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) तपास करत आहे. हे पैसे ज्या खात्यांमध्ये जमा झाले होते, त्याची चौकशी सुरू आहे.