पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील सायखेडा येथे शनिवारी रात्री उशिरा नाशिकचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने कारवाई करीत एका गोडाऊनमधून सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांचा गुटखा हस्तगत केला. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. सायखेड्याचे पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी याबाबत दुजोरा दिला आतापर्यंतच्या हाती आलेल्या बातमीनुसार एक कोटीहून अधिक रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी (दि. ३) रात्री उशिरा नाशिकहून औरंगाबादकडे एका मोठ्या वाहनात (आयशर/ट्रक) एक कोटी सहा लाखांचा परराज्यातून आलेला गुटखा हस्तगत करण्यात आला. काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धडक कारवाई करीत सायखेडा परिसरात गुटखाकिंगच्या मुसक्या आवळल्या. सुत्रांच्या माहितीनुसार हा गुटखा मोठ्या रकमेचा असल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, सायखेडा येथील पोलीस निरीक्षक अडसूळ हे तपास करीत आहे.