नाशिक – नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या अध्यक्षतेखाली शहरात सायकल चळवळ सुरू झाली आहे. नाशिक शहर सायकल कॅपिटल बनविण्यासाठी ‘मिशन फॉर हेल्थ’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकत्र सायकल उपक्रम घेणे शक्य नाही, म्हणून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने सदस्यांना ‘स्ट्राव्हा’ ॲपद्वारे क्लबला जोडले आहे. सायकल चालवा आणि मेडल मिळवा या संकल्पनेला अधिकाधिक बळ दिले जात आहे.
यात ७९७ सदस्यांनी एकूण ४८ दिवसात ४ लाख १२ हजार २७८ कि.मी. अंतर पूर्ण केले आहे. यामध्ये जे सायकलिस्ट १ ते ३० तारखेपर्यंत १००० , २००० , ३००० व ५००० कि.मी चा टप्पा पूर्ण करणाऱ्यांना स्टार बॅजेस व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात एकूण ४१ सदस्यांचा सहभाग आहे. तसेच १००० कि.मी. अंतर पूर्ण करणाऱ्या २०० सदस्यांना नाशिक सायकलिस्ट जर्सी भेट म्हणून देण्यात येणार आहे. नाशिक सायकलिस्ट, मिशन फॉर हेल्थ या उपक्रमात महिलांचा सहभाग वाढवा या अनुशगांने १ ऑक्टोबर २०२० ते ९ मार्च २०२१ या पाच महिन्याच्या कालावधीत महिला सबलीकरणा अंतर्गत शहरातील महिला, विद्यार्थिनींना १५० दिवसात १००० कि.मी. सायकलिंग चैलेंज पूर्ण करायचे आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना भेटवस्तू व टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच १००० कि.मी. अंतर पूर्ण करणाऱ्या महिलांना ८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त स्टार बॅचेस देऊन गौरवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.