मुकुंद बाविस्कर, नाशिक
कोरोनामुळे गेल्या सहा- सात महिन्यात नागरिकांचे जीवनमानच बदलून गेले आहे. देशभरातील सर्वच लोक आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेऊ लागल्याचे ठप्प झाला आहे. त्यातच अनेक ठिकाणी जीम, जॉगींग ट्रॅक आणि क्रिडा संकुले देखील बंद असल्याने नागरिकांनी व्यायामासाठी सायकल या पारंपरिक प्रकाराकडे पुन्हा वळू लागले आहेत.
सहाजिकच कोरोनाकाळात नाशकात सायकलींच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली असून काही विक्रेत्यांकडे सध्या सायकलींची टंचाई असल्याने आगाऊ नोंदणी देखील करण्यात येत आहे. तसेच रिंग, टायर, ट्यूब, शिट कव्हर आदी सुट्या भागांचीही मोठ्या प्रमाणावर टंचाई असल्याचे सायकल विक्रेत्यांनी सांगितले आहे.
देशभरात तीन-चार महिने लॉकडाऊन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार अनलाॅक करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे अबालवृद्धांना संपूर्ण दिवस घरीच रहावे लागत होते. या कालावधीत लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या. अद्यापही अनेक नोकरदार मंडळी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला दिसून येत आहे. अनेक तास घरीच बसून काम करावे लागत असल्याने तसेच दिवसभर एकाच जागी बसू राहिल्याने आरोग्याच्या समस्या उद्भभवल्या आहेत. आता अनलाॅक झाल्याने सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, जीम, हेल्थ क्लब आणि क्रिडा संकुले बंद आहेत. त्यामुळे अनेकांनी सायकल चालवणे हा व्यायामाचा पारंपारिक प्रकार निवडला आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच सिडको, सातपूर, अंबड, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, नाशिकरोड, पंचवटी आदी उपनगरांमध्ये ठिकठिकाणी सकाळी आणि सांयकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर सायकली वापरण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे सायकल उद्योगाला चांगले दिवस आले आहेत.
दुपटीने सायकलीच मागणी
गेल्या सहा महिन्यांत सायकलीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यासंबंधी भांड सायकलचे संचालक राहुल ओढेकर यांनी सांगितले की, पूर्वी वर्षभरात सरासरी १०० ते १२५ सायकलीची विक्री होत असे मात्र गेल्या सहा महिन्यात यामध्ये जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. तर ए टु झेड सायकलचे संचालक के. मर्चंट यांनी माहिती देताना सांगीतले की, दोन वर्षापूर्वी लहान मुले आणि तरूण मुले हेच सायकल चालवत असत. आता सर्वच वयोगटातील लोक सायकल चालवत असल्याने विक्रीत सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे अंकीत झवर या सायकल विक्रेत्याने सांगितले की, साधारणतः ४०टक्के मागणी वाढली असून सध्या मालाची टंचाई जाणवत आहे. तरीही आम्ही ग्राहकांची नोंदणी करून त्यांना सायकल मिळण्याकरिता प्रयत्न करतो.
उद्योगांचा विस्तार
कोरोना काळात देशभरातील विविध राज्यात सुमारे ३४ लाख सायकली विकल्या गेल्या आहेत. म्हणजे रोज ३७ हजार सायकलींची विक्री झाली. तसेच भारतात दरवर्षी २.२० कोटी सायकलींचं उत्पादन होते.भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सायकल उत्पादक देश आहे. संपूर्ण देशात सायकल उद्योगाशी संबंधित जवळपास ४ हजार युनिट्स आहेत. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक व युनिट्स लुधियानात आहेत. देशाच्या मागणीच्या जवळपास ९० टक्के उत्पादन करणार्या लुधियानाने या व्यवसायात १०० टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदविली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ दुप्पट आहे. कोरोना काळात सरकारी ऑर्डर बंद असतानाही सायकलच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. देशात सायकलींचे उत्पादन एप्रिलमध्ये साडे चार लाखांवर आणि त्यानंतर जूनमध्ये साडे आठ लाखांवर गेले आहे. जुलै अखेर हा आकडा ११ लाखांच्या पुढे गेला आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर माहिन्यात सायकलींची मोठ्या प्रमाणात अगाऊ नोंदणी झाली आहे. त्यामुळे भारतीय सायकल उद्योग सध्या ५-६ टक्क्यांनी वाढत आहे.