नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीच्या फतेहपूर बेरी परिसरात १८-१९ मार्चला रात्री मद्य प्राशन करून फिरणा-या तीन मित्रांनी एका २५ वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली. तीन आरोपींचे पीडितेच्या भावाशी त्यांच्या गल्लीत भांडण झाले होते आणि पीडिता भावाला वाचवण्यासाठी आली होती. घटनेच्या माहितीनंतर फतेहपूर बेरी पोलिसांनी पीडितेच्या जबाबानंतर गुन्हा दाखल केला. तिन्ही संशयित आरोपी नवीन, योगेश, बलजीत ऊर्फ मोनू यांना अटक केली आहे. संशयित आरोपी आयानगर इथरे रहिवासी असून, प्रॉपर्टी डिलरचं काम करतात.
पोलिस उपायुक्त अतुल कुमार ठाकूर यांच्या माहितीनुसार, पीडिता आपल्या कुटुंबासोबत दक्षिण दिल्लीमध्ये राहते. १८ मार्चला रात्री ती तिच्या घरी होती. त्यादरम्यान तिने तिच्या भावाचा ऐकला आणि ती बाहेर आली. बाहेर तीन जण एका कारमध्ये बसून तिच्या भावासोबत भांडण करत असल्याचे तिने पाहिले. पीडिता तिथे पोहोचली आणि तिच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिन्ही आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन केले. आरोपींनी पीडितेला मारहाण केली आणि जबरदस्तीने कारमध्ये टाकून सामुहिक अत्याचार केला. घटनेदरम्यान आरोपींनी पीडितेच्या भावाला तिथेच पकडलेलं होते. घटनेनंतर पीडिता आणि तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. पीडितेनं स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय चाचणी करून तिच्या जबाबावरून आरोपींचा शोध सुरू केला.
गाडीतूनच आरोपींना अटक
घटनेचं गांभीर्य बघता एसएचओ कुलदीप सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथके बनवली आणि तपास सुरू केला. त्यादरम्यान एका लुटीचा कॉल पोलिसांना आला. या प्रकरणातही आरोपी आणि गाडीची संख्या सारखीच होती. पोलिस पथकांनी दोन्ही घटनांचा तपास सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरून गाडीचा नंबर घेतला. त्याच्या सहाय्यानं आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबीयांकडून त्यांच्याबाबत माहिती घेऊन जंगल परिसरात छापेमारी करून त्यांना ताब्यात घेतले.
सामुहिक अत्याचारानंतर लूटमार
सामुहिक अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरू पळून गेले. काही अंतरावर गेल्यावर त्यांनी नगर जी ब्लॉकमध्ये ट्रकमधून विटा उतरवणा-या मजुरांना मारहाण करून त्यांच्याकडून ३० हजार रुपये लुटले. ट्रकचालकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामध्ये आरोपी आणि गाडी एकच होती.
पार्टी करून निघाले आरोपी
तिन्ही आरोपी एकाच भागात राहत असून, जुने मित्र आहेत. तिघेही नेहमी सोबतच पार्टी करत असतात. घटनेच्या रात्रीसुद्धा आरोपी पार्टी करण्यासाठी निघाले होते. पार्टीनंतर तिघांनी गाडीमध्ये मद्य प्राशन केले आणि गाडी घेऊन फिरू लागले. त्यादरम्यान त्यांना पीडितेचा भाऊ भेटला. तेव्हा शिवीगाळ करू नका असे भाऊ म्हणाला. आरोपींनी त्याच्याशी भांडण सुरू केले. भांडणानंतर तिघांनी दुष्कृत्य केले आणि जंगलात जाऊन लपले.