नाशिक : माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा भाजप प्रवेश म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका करत आगामी मनपा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास पंचवटीतील प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. गेल्या निवडणुकीत बाळसाहेब सानप यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले आता पुन्हा त्यांना पक्षांत प्रवेश देऊन पवित्र करून घेऊन भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याचे ठरवले की काय ? असा प्रश्न आता सर्वसामन्यांना पडला असून अशी ही नौटंकी येणाऱ्या काळात जनता स्विकारणार नाही शिवाय येणाऱ्या मनपा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार असेही राऊत यांनी सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापले गेले तेव्हा बंडखोरी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी करत भाजपच्या नेत्यांना शह देण्याचा प्रयत्न केला.परंतु मतदारांनी त्यांना नाकारले नंतर निवडणुकीचा उत्साह संपताच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने शिवसेनेत प्रवेश करून भाजपला महानगरपालिकेची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला.पण फाजील आत्मविश्वासाच्या जोरावर केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला आणि भाजपचा महापौर झाल्याने बाळासाहेब सानापांची कोंडी झाली. महापालिकेत २० वर्षापासून बसलेले बस्तान गेल्याने बैचैन होते. शिवसेनेत निष्ठावान शिवसैनिकांपुढे टिकाव लागत नसल्याने सत्तेविना करमेना अशी स्थिती निर्माण झाली असल्याने भाजप प्रवेश केला आहे.
त्यामुळे राज्यांतील भाजप नेत्यांवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता सर्व सामान्य माणसाला पडला आहे.कारण मागील मनपा निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली खरी पण सावत्र बापाची वागणूक देऊन नाशिकवर अन्याय केला. बांधकाम नियमावली करतांना किचकट नियम लाऊन नाशिकवर अन्याय केला. युनिफाईड डीसीपीआर अनेक दिवस प्रलंबित ठेवल्याने किचकट नियमांमुळे नाशिकच्या विकासाला खीळ बसवण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचेही राऊत यांनी सांगितले.