नाशिक – कमोदनगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सातव्या मजल्यावरून पडल्याने २० वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. मृत युवक हा सोसायटीची देखभाल करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा आहे. रात्रीच्या सुमारास तो टेरेसवर झोपण्यासाठी गेला होता. त्याचवेळी ही घटना घडल्याची नोंद इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडूबा गाडेकर व त्यांचे कुटुंबिय प्लेटिना टॉवर्स या इमारतीच्या देखभालीचे काम करतात. ते तेथेच राहतात. त्यांचा मुलगा नितीन (वय २०) हा बुधवारी (२५ नोव्हेंबर) रात्री इमारतीच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवर झोपण्यासाठी गेला. रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक तो जमिनीवर कोसळला. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.