वीज वितरण कंपनीच्या आशिर्वादाने सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांची लुट
नाशिक – सातपूर येथील शिवाजीनगर परिसरातील कार्बन नाका येथे रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्यांना वीज पुरवठा देऊन एका पान टपरीच्या चालकाने लाखाे रुपयांची कमाई करुन भाजी विक्रेत्यांसह वीज वितरण कंपनीला जाेरदार झटका दिला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने चक्क पाच बाय पाच आकाराच्या पान स्टाॅल मध्ये वीज वितरण कंपनीकडून थ्री फेज चे कनेक्शन घेतले आहे.
काेराेना या जागतिक महामारीच्या काळात अनेकांचे राेजगार बुडाले. त्यामुळे उपजिविकेसाठी बहुतांश लाेकांनी भाजीपाल्यासह वेगवेगळ्या व्यवसायात उडी घेऊन आपला उदर निर्वाह भागवण्याचा मार्ग निवडला आहे. अशाच प्रकारे शिवाजीनगर परिसरात ठिकठिकाणी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेच्या वतीने नेहमीच अतिक्रमणाची कारवाई केली जात हाेती. यावर ताेडगा काढण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी सर्व भाजी विक्रेत्यांना कार्बन नाका येथे कार्बन कंपनीच्या भिंतीलगत जागा उपलब्ध करुन दिली. तेव्हापासून या ठिकाणी एकाच रांगेत भाजी विक्रेते व दुसऱ्या बाजुला मासे विक्रेते आपआपला व्यवसाय करत आहे. विशेष म्हणजे रहदारीला अडथळा हाेऊ नये याबाबतची काळजी देखील नगरसेवक पाटील यांनी घेऊन या व्यावसायिकांना चांगली संधी मिळवून दिली आहे. मात्र याचा फायदा आता काही ‘संधीसाधू’ घेऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून एकाने तर चक्क पान टपरीच्या नावावर थ्री फेज कनेक्शन घेतले असून त्यामाध्यमातून त्याने भाजी विक्रेत्यांसाठी कार्बन कंपनीच्या भिंतीलाच विद्युत जाेडणी करुन सर्वांसाठी स्वीच उपलब्ध करून दिले आहे.
या माेबदल्यात एका विक्रेत्याकडून एका एलइडी बल्बसाठी १५ तर दाेन बल्बसाठी ३० रुपये दरराेजची आकारणी केली जात आहे. स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी सुरु केलेल्या या उद्याेगामुळे भाजी विक्रेत्यांच्या सुरक्षिततेची काेणत्याही प्रकारची काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार काेण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित हाेत आहे.
लाखाेंची वसुली महावितरणची मात्र बाेळवण
एका भाजी विक्रेत्याकडून दिवसाला ३० रुपये अर्थातच एका महिन्याला ९०० रुपये वसुल केले जातात. या ठिकाणी अशा प्रकारे चारशेहून अधिक व्यावसायिक असल्याने त्यांच्याकडून लाखाे रुपयांची वसुली करून महावितरणची मात्र काही हजारांतच बाेळवण केली जात आहे.
पावसाळ्यात वीज प्रवाह उतरण्याची शक्यता
भाजी विक्रेत्यांना कनेक्शन देताना वीज कंपनीचे नियम धाब्यावर बसवण्यात अाले अाहेत. त्यामुळे पावसाळ्यात भिंतीवरुन येणाऱ्या पाण्यामुळे विद्युत प्रवाह उतरुन एखादी दुर्घटना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
…
कनेक्शन तात्काळ रद्द केले जाईल
अर्जदाराने मागणी केल्यानुसार आम्ही त्यांना थ्रीफेजचे कनेक्शन दिले हाेते. मात्र त्यांनी कनेक्शनचा वापर भाजी विक्रेत्यांसाठी केल्याबाबतची माहिती नव्हती. हे चुकीचे असून त्यांचे कनेक्शन तात्काळ रद्द केले जाईल.
– ऋषीकेश जाेगळेकर, सहायक अभियंता, एमआयडीसी विभाग