नाशिक – सातपूर येथे छोट्याश्या पान टपरीत थ्री फेज कनेक्शन घेवून सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांची लूट करतानाच महावितरणला चुना लावणाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
प्रभाग ९ मध्ये कार्बन नाका परिसरातील भाजीबाजारात एका पान टपरीधारकाने आपल्याकडून थ्री फेज विद्युत कनेक्शन घेऊन त्याद्वारे तेथील भाजी विक्रेत्या व्यावसायिकांना चुकीच्या पद्धतीने लाईट देऊन त्यामाध्यमातून दैनंदिन प्रत्येकी १५ व ३० रुपयांची वसुली केली जात आहे. याचा अर्थ त्याठिकाणी महावितरणची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली गेली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तुम्ही त्या ठिकाणी जावुन त्या व्यक्तीचे मीटर जमा केले परंतु एवढ्याश्या कारवाईवर न थांबता या सर्व गोष्टी कोणाच्या पाठिंब्यावर केल्या गेल्या,याचा मुख्य सूत्रधार कोण,या सर्वांची चौकशी करून कार्यवाही करावी.
आपण जर यावर योग्य कार्यवाही केली नाही तर आपल्या विभागातील अधिकारी देखील यात सामील असल्याचा समज निर्माण होईल व संबंधितांसह महावितरण विरोधात आंदोलन उभे केले जाईल. यामुळे होणाऱ्या परिणामास आपले प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा शिवसेनेचे युवा पदाधिकारी साहेबराव जाधव, संतोष पवार, बाळा जारे, तुषार पाटील, सोनू काळे, प्रवीण इंगोले, विनोद जाधव, सचिन अहिरे, सुमित बच्छाव, उमेश काळे आदींनी दिला आहे.