नाशिक : शेतातील चंदनाचे झाड कापून पसार होण्याच्या प्रयत्नात पकडलेल्या चोरट्याचा साथीदार सातपूर पोलीसांच्या हाती लागला असून, संशयीतांच्या ताब्यातून झाड कापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व चंदनाचा गाभा असलेले तुकडे जप्त करण्यात आले आहेत. संशयीतांच्या अटकेने चंदन तस्करीचा भांडाफोड होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
सुखदेव सोमनाथ कातोरे (३० रा.वीरगाव ता.अकोले) व चंदू विष्णू खंडवे (२८ रा.पांगरी ता.अकोले जि.अ.नगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. वासाळी येथील शिवराम महादू भावले यांच्या शेतात चोरटे चंदनाचे झाड कापत असल्याची माहिती सोमवारी (दि.८) पहाटेच्या सुमारास सातपूर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी धाव घेतली असता सुखदेव कातोरे हा संशयीत पोलीसांच्या हाती लागला होता. तर त्याचा साथीदार पसार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना तो वासाळी परिसरातील विश्वासनगर भागात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी शोध घेवून त्यास जेरबंद केले असून दोघांच्या ताब्यातून झाड कापण्यासाठी वापरण्यात येणारी करवत,गिरमीट व अन्य साहित्य तसेच चंदनाचा गाभा असलेले तुकडे असा सुमारे ६ हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मजगर,नागरे,उपनिरीक्षक पाटील,हवालदार शिंदे,गिते,भामरे,पोलीस नाईक आव्हाड,झोले शिपाई जिरे,आघाव,कांडबहाले,महाले आदींच्या पथकाने केली.